कोकणात मोठी राजकीय उलथापालथ! राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम करणार घरवापसी? | पुढारी

कोकणात मोठी राजकीय उलथापालथ! राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम करणार घरवापसी?

खेड, अनुज जोशी : दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम पक्षांतर करण्याची चर्चा सुरू असून ते लवकरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली. यामुळे सध्या खेड, दापोली परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार संजय कदम हे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने आमदारकीचे तिकीट दिले होते. राष्ट्रवादीने दिलेल्या तिकिटाचे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी शिवसेनेकडे असलेल्या दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता व शिवसेनेचे मुरब्बी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला. मात्र कदम यांच्या विधानसभेच्या दुसऱ्या निवडणुकीत राजकारणात नवख्या असलेल्या युवा सेनेच्या योगेश कदम यांनी अस्मान दाखवले आणि दापोलीच्या गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला.

मात्र त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आमदार योगेश कदम व संजय कदम यांचा सामना होत आला आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे अशा दोन गटात झालेल्या विभाजनानंतर आमदार योगेश कदम शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटात सक्रिय आहेत. मात्र तेव्हाच संजय कदम मात्र या संधीचा फायदा उचलून उद्धव सेनेकडे जवळीक साधून असल्याचे वृत्त असून लवकरच खेडच्या गोळीबार मैदानात आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत त्यांचा व समर्थकांचा मोठ्या संख्येने राष्ट्रवादीतून उद्धव सेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते.

यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून आगामी पंचायत समिती, जिल्हापरिषद, खेड नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश होणार असल्याचे येथे बोलले जात आहे. मात्र असे घडल्यास राष्ट्रवादीचे या मतदारसंघात मोठे नुकसान होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

.हेही वाचा 

मेट्रोचे काम संपले तरी सिग्नल सुरू होईनात! कल्याणीनगर येथेे कोंडी नित्याचीच

सातारा : महाबळेश्वर बाजारपेठेचा आराखडा राबवला तर पर्यटनात वाढच होईल : अजित पवार

Star : तार्‍याला गिळत असलेले कृष्णविवर

Back to top button