सातारा : महाबळेश्वर बाजारपेठेचा आराखडा राबवला तर पर्यटनात वाढच होईल : अजित पवार | पुढारी

सातारा : महाबळेश्वर बाजारपेठेचा आराखडा राबवला तर पर्यटनात वाढच होईल : अजित पवार

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरच्या बाजारपेठेचा आराखडा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मी आम्ही दोघांनी तयार केला होता. हा आराखडा जसाच्या तसा राबवला असता तर महाबळेश्वरच्या पर्यटनात वाढ झाली असती. याचा फायदा हा बाजारपेठेतील व्यापार्‍यांना झाला असता, अशी माहिती विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी दिली.

महाबळेश्वर येथे खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी वेण्णालेक व बाजारपेठेतील विषयासंदर्भात पत्रकारांशी चर्चा केली. आ. अजित पवार म्हणाले, आम्ही ज्या ज्या ठिकाणचा नवीन आराखडा तयार केला आहे. त्या त्या ठिकाणी येणार्‍या भाविकांच्या व पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई येथील सिध्दीविनायक मंदिर असो अथवा शिर्डी येथील साई बाबा मंदिर असो या ठिकाणी भाविकांची संख्या वाढली आहे. महाबळेश्वर येथील पर्यटनात वाढ व्हावी यासाठी आम्ही हा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा राबवला तर येथील पर्यटन अधिक बहरणार आहे. तेच तेच पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना काही तरी वेगळे पहावयास मिळाले असते. व्यापार्‍यांनी भविष्याचा विचार केला पाहिजे, अजूनही वेळ गेलेली नाही. आदित्य ठाकरे व मी तयार केलेला आराखडा राबवला जावा. यासाठी मी मुंबईला गेल्यानंतर खा. श्रीकांत शिंदे व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची भेट घेणार आहे. महाबळेश्वरप्रमाणे तापोळ्यातही पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी तापोळ्याच्या सुशोभीकरणाचा 65 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे आ. अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, वेण्णा धरणातील पाणीसाठा पाहिला असता पाणी खाली गेल्याचे निदर्शनास आले तेव्हा अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. या धरणाला गेली अनेक वर्षे गळती सुरू आहे. या धरणाची उंची वाढवण्यापेक्षा गळती काढण्याला प्राधान्य दिले पाहिजे. गळती काढण्यासाठी अनेक आधुनिक उपाय आले आहेत, त्याचा वापर करून गळती बंद केली पाहिजे. अन्यथा उन्हाळयात महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांना पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, श्रीकांत पार्टे, सचिन दीक्षित, चंद्रकांत पारवे, अविनाश शेडोळकर उपस्थित होते.

Back to top button