नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका | पुढारी

नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पेठ रोडवरील तवली फाटा येथे कारवाई करीत अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी नववर्षापासून शहरातील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी कारवाई करीत २५ हून अधिक गुन्हे दाखल केले असून, अवैध मद्यविक्री व साठा करणाऱ्यांना ताब्यात घेत आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार मोतीराम चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने मंगळवारी (दि.१७) तवली फाटा येथे कारवाई केली. या कारवाईत संशयित रमेश अशोक कुमार (५८, रा. जलाराम धाबा, तवली फाटा) याच्या ताब्यातून देशी मद्याचा १४ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा किशोर भामरे (रा. म्हसरूळ) याचा असल्याची कबुली रमेश कुमारने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पथकाने म्हसरूळ पोलिस ठाण्यात रमेश कुमार व किशोर भामरेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, अंमलदार सुरेश माळोद, रामदास भडांगे, आसिफ तांबोळी, योगीराज गायकवाड, मोतीराम चव्हाण, अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

शांतीनगर झाेपडपट्टीत कारवाई

अंबड पाेलिस ठाण्याचे पाेलिस शिपाई समाधान शिंदे यांना शांतीनगर झोपडपट्टीत एक संशयित देशी मद्य विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार (दि.१७) सायंकाळी पावणेसात वाजता पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी संशयित सनी मुकंदा बोरकर हा पसार झाला. या ठिकाणाहून पोलिसांनी ८०५ रुपयांच्या देशी मद्यसाठा जप्त केला आहे.

हेही वाचा :

Back to top button