कोकणातील जनआशीर्वाद यात्रा स्थगित; दरेकर कोकणात दाखल | पुढारी

कोकणातील जनआशीर्वाद यात्रा स्थगित; दरेकर कोकणात दाखल

सिंधूदुर्ग, पुढारी ऑनलाईन: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता कोकणातील जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राणे यांना अटक झाली तरी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू राहील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्या मंत्र्यांची बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सर्व राज्यांतील मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली.

राणे यांनी मुबंईतून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. पहिल्यापासून ही यात्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेमुळे चर्चेत होती.

राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना टार्गेट केले होते.

मुंबई येथील यात्रेवेळी त्यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर ही यात्रा कोकणात आली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणाचा संदर्भ देत कानाखाली मारण्याचे वक्तव्य केले होते.

त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

तत्पुर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राणे यांची पाठराखण केली.

त्यावेळी त्यांनी जनआशीर्वाद यात्रा काहीही करून सुरू राहील.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू राहील असे जाहीर केले होते.

प्रवीण दरेकर यांनीही तसे जाहीर केले. राणे यांना अटक होण्याचे संकेत मिळताच दरेकर मुंबईतून कोकणाकडे जायला निघाले होते.

दरेकर यांनी माध्यमांना तशी माहितीही दिली होती. दरेकर यांनी जनआशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करण्याचे नियोजन केले होते.

मात्र, बुधवारी सकाळी जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. राणे यांच्या नेतृत्वाखालीच ही यात्रा निघेल यासाठी आग्रह आहे.

भाजपात दुफळी

राणे यांना दीर्घकाळानंतर मोठे पद मिळाले आहे. त्यामुळे कोकणातील राणे गटाला बळ मिळाले आहे.

राणे यांचा आक्रमक स्वभाव आणि कार्यशैलीप्रमाणे त्यांची केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यात एंट्री झाली.

मात्र, शिवसेनेच्या भूमिकेमुळे त्यांना ब्रेक लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

काही दिवसांपूर्वी कोकणात पाहणीसाठी गेल्यानंतर राणे यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना त्यांच्या स्टाईलमध्ये गप्प बसविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्यावरून प्रचंड मीम्जही व्हायरल झाल्या होत्या. राणे जनआशीर्वाद यात्रेसाठी मुबंईतील आल्यानंतर दरेकर पहिल्यापासून त्यांच्यासोबत होते.

त्यानंतर रात्रा कोकणात गेल्यानंतर राणे गट सक्रीय झाला होता. राणे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यापासून भाजपचे अन्य नेते पडद्याआड गेल्याचे दिसत आहे.

एकूण मीडिया त्यांनी व्यापल्याचे दिसत आहे. राणे यांना अटक झाल्याने पुढील जनआशीर्वाद यात्रा निघणार का? याबाबत साशंकता होती.

देवेंद्र फडणवीस काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला.

त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रा होईल असे जाहीर केले. मात्र, राणे यांनी याला आक्षेप घेतल्याचे समजते. ही संकल्पना केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अंमलात आणण्याची आहे. त्यामुळे यात हस्तक्षेप करू नका असा निरोप दिल्याचे समजते.

Back to top button