या आहेत धोकादायक वनस्पती : केवळ स्पर्शानेही माणसाचा जीव जाऊ शकतो | पुढारी

या आहेत धोकादायक वनस्पती : केवळ स्पर्शानेही माणसाचा जीव जाऊ शकतो

जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठीच झाडा-झुडपांचे अतिशय महत्त्व आहे. झाडे आपल्याला सावली व ऑक्सिजनपासून ते फळे, भाज्या, लाकूड, डिंक आणि रबरापर्यंत अनेक प्रकारच्या देणग्या देत असतात. मात्र, जगाच्या पाठीवरील काही वनस्पती अत्यंत धोकादायकही आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शानेही माणसाचा जीव जाऊ शकतो. अशाच काही वनस्पती विषयीची ही माहिती…

मंचीनील ट्री : हा जगातील सर्वात खतरनाक वृक्ष आहे. मध्य व दक्षिण अमेरिकेत हे झाड आढळते. त्याचे फळ इतके विषारी असते की त्याच्या सेवनाने माणसाचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो. नीट काळजी घेतल्याशिवाय या झाडाच्या जवळही जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या झाडाला ‘डेथ अ‍ॅपल ट्री’ असेही म्हटले जाते.

रोजरी पी : हे झाड अतिशय सुंदर व आकर्षक दिसते. मात्र, या झाडाचे बीज धोकादायक असतात. जर या बियांना चिरडण्याचा किंवा दातांनी तोडण्याचा प्रयत्न केला तरी मृत्यू होऊ शकतो. या बियांमध्ये ‘एब्रिन’ असते. त्याचे केवळ 3 मायक्रोग्रॅम विषही एखाद्या माणसाचे प्राण घेऊ शकते.

जायंट हॉगवीड : हे झाड ब्रिटनमध्ये आढळते. झाडाची पांढरी फुले अतिशय आकर्षक असतात. ही फुले जितकी सुंदर असतात तितकीच घातकही असतात. या फुलांच्या सेवनाने आजपर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. या फुलांच्या केवळ संपर्कात आल्यानेही अंधत्व येऊ शकते.

सरबेरा ओडोलम : या झाडाला ‘सुसाईड ट्री’ म्हणजेच ‘आत्महत्येचे झाड’ म्हणूनच ओळखले जाते. जुन्या काळी या झाडाचा वापर आत्महत्या करण्यासाठीही केला जात होता. अत्यंत विषारी असलेले हे झाड आजही लोकांसाठी धोकादायक बनून राहिलेले आहे.

Back to top button