राजू शेट्टी आमदारकी, खासदारकीमागची फरफट रोखणार का?

राजू शेट्टी आमदारकी, खासदारकीमागची फरफट रोखणार का?
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील: पुढारी ऑनलाईन: राजू शेट्टी यांच्‍या विधान परिषद आमदारकी  साठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे पद कितीही घटनात्मक असले तरी कोश्यारी हे भाजपचेच काम करत आहेत, हा आरोप त्यांच्या काही वर्तनातून खरा वाटतो. शेट्टी यांना आमदारकी नाकारणे हे केवळ वरवर दिसणारे कारण नाही. तर त्यामागे त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिलेले आव्हान आहे.

जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा चढता क्रम कुठल्याही राजकीय नेत्यांच्या आयुष्यात अपवादाने येतो. प्रचंड क्षमता, राजकीय भान आणि कट्टर कार्यकर्त्यांचे जाळे असलेले नेते ही शिडी चढू शकले.

पश्चिम महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टी यांना हे जमले कारण त्यांनी जमिनीवरचे, मातीचे प्रश्न घेऊन मैदानात उडी मारली.

त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते. शेतकऱ्याच्या शिकलेल्या पोरांच्या अंगात जी क्रांतीची धग असते.

ती धग अनेकांना एकत्र आणत होती आणि या धगीने राजू शेट्टी नावाचा बुलंद नेता दिला. या नेत्याने अनेक प्रस्थापितांना धक्के दिले.

बागायती, ऊसपट्टा आणि नदीकाठच्या गावांतील प्रश्नांवर शेट्टींचे राजकारण उभे होते. या गावांना मुबलक पाणी, काळी कसदार जमीन होती.

शेतात टाकेल ते उगवत होतं; पण त्यांच्या मालाला म्हणावा तसा भाव नव्हता. म्हणूनच त्यांनी ऊस शेतकऱ्यांची मोट बांधली.

शास्त्रशुद्ध मांडणी करत विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या शरद जोशींच्या विचारांचा त्‍यांच्‍यावर प्रभाव पडला.

पुढे जोशी भाजपच्या वळचणीला गेले आणि शेट्टींनी बाणा दाखवत त्यांना टाटा केला. शेट्टी यांनी या निर्णयामुळे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन घडविले.

किंबहुना त्यांनी अनेकदा तो मुद्दा अधोरेखित केला. सदाभाऊ खोत, उल्हास पाटील, कोल्हापुरात भगवान काटे यांच्यासारखे साथी लाभल्याने संघटना जोमात होती.

राजू शेट्टींची जिल्हा परिषद सदस्यत्वाची टर्म संपायच्या आत ते आमदार झाले. आमदारकी संपायच्या आधी ते खासदार झाले. हा वेग प्रचंड होता.

देशभरात शेतकरी नेत्यांशी संपर्क

शेतकऱ्यांना शेट्टी यांच्या रुपाने त्यांचा आवाज मिळाला होता. कुणी कितीही नाकारले तरी शेट्टींनी शेतकऱ्यांना हक्काचा आवाज दिला.

आजही शेट्टींचा जिथे संबंध नाही तिथे अनेकजण अधिकारी असो की व्यापारी शेट्टींच्या नुसत्या नावावर दम देतो.

शेट्टी खासदार झाले आणि त्यांनी देशभरातील शेतकरी नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली. अनेक मोर्चे काढले.

दरम्यानच्या काळात दुसऱ्या खासदारकीवेळी त्यांनी थेट भाजपशी सोयरीक केली आणि तिथेच संघटनेचे पावित्र्य हरवून बसले. पुढे मोदींशी त्यांचे जमले नाही त्यामुळे तेथून बाहेर पडले आणि या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला.

ज्या शरद पवारांना टीकेचे लक्ष्य करून शेट्टींची राजकीय कारकीर्द बहरली त्याच पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणे अनेकांना पचले नाही. त्यात शेट्टींचा पराभव झाला.

संघटनेत पदांची चटक

एव्हाना संघटनेत अनेकांना पदाची चटक लागली. सदाभाऊ खोतांना आपला मागचा सगळा इतिहास मागे टाकून भाजपात गेले, मंत्री झाले.

रविकांत तुपकर १५ दिवसांची वारी करून आले. भगवान काटे आता भाजपचे कट्टर कार्यकर्ते झालेत.

त्याआधी उल्हास पाटील शिवसेनेत जाऊन आमदार झाले.

या सगळ्यांना नावे ठेवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राजू शेट्टी यांना नाही.

कारण राजू शेट्टी यांनी यांनी चळवळ आणि राजकारण यातील गफलत भाजपशी घरोबा करून अधोरेखित केली होती.

त्यामुळे प्रत्येकाने आपले मार्ग चोखाळले.

‍ भाजपशी घरोबा हा आत्मघातच

या सगळ्यात प्रचंड नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. राजू शेट्टी यांनी भाजपशी घरोबा केला, तो किती नुकसानीचा आहे हे लक्षात येताच त्यांनी तो मोडला.

महाविकास आघाडीने दाखविलेले मधाचे बोट किती कडू आहे हे लक्षात येताच त्यांनी घेतलेला निर्णय हा शहाणपणाचा आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत झालेल्या फाटाफुटीने मूळ प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांनी ही चळवळ चर्चेत राहिली.

एकोप्याने राहणारे भाऊ शेताच्या बांधासाठी कोर्टकचेऱ्या करून करू लागले की काहीजण हळहळतात.

काहीजण मजा बघतात तर काहीजण काड्या करतात अशीच काहींशी अवास्था स्वाभिमानीची गेल्या काही वर्षांत झाली आहे.

शेतकरी शहाणपणा

राजू शेट्टी यांनी वेळोवेळी शेतकरी शहाणपणा दाखवला, मात्र गेलेली विश्वासार्हता मिळविण्यासाठी त्यांना २० वर्षे मागे जावे लागेल.

शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांशी केलेला घरोबा अनेकांचे संसार उद्‍ध्‍वस्‍त करणारा ठरला आहे. कुठलाही सत्ताधारी लोणच्यासारखे शेतकऱ्याचा वापर करतो, प्रेम दाखवतो याचा एव्हाना त्यांना अनुभव आला असेल.

केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या फुटून गेलेल्या सहकाऱ्यांनाही आला असेल.

गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांच्यासारखा प्रचंड क्षमता असलेला नेता गपगार आहे.

रविकांत तुपकर स्वाभिमानीत परतलेत मात्र, नेताच अंधारात चाचपड असल्याने त्यांना संधी मिळेना.

उल्हास पाटील हे तडफदार आमदार होते तरीही त्यांना आपल्याच पक्षाच्या 'मुक्या' मारामुळे काही बोलता येईना.

यावरून या सगळ्यांना चळवळीची अपरिहार्यता लक्षात आली असेल.

शेट्टींच्या पराभवामागे मोठी ताकद

राजू शेट्टी यांच्या पराभवामागे केवळ स्थानिक कारणे कारणीभूत नाहीत तर त्यामागे मोठी ताकद आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.

शेट्‌टी दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी देशपातळीवरील शेतकरी नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला.

हा प्रयत्न म्हणजे थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान होते.

शेट्टी यांच्या या प्रयत्नांना हाणून पाडायचे तर त्यांचा पराभव करणे हे मोठे काम स्थानिक पातळीवर केले गेले.

शेट्टींचा पराभव ही चळवळीची हानी, आहे असे स्वाभिमानीचे नेते सांगत होते, मात्र त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते.

याचे मुख्य कारण संघटनेचे म्होरकेच पदांच्या लालसेपोटी आपल्या तत्वांना मातीत घालत होते. राजू शेट्टी आमदारकी साठी काय करतात हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.

राष्ट्रवादीत मित्रांपेक्षा शत्रू जास्त

महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार १२ जणांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत त्यांचे नाव होते. मात्र, एकूणच राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीशी शेट्टी फटकून वागतात.

सध्या जो 'करेक्ट कार्यक्रम' हा वाक्प्रचार प्रचलित आहे तो जयंत पाटील यांनी शेट्टींसदर्भात केला होता.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि शेट्टी नेहमीच एकमेकांविरोधात असतात.

त्यामुळे शेट्टींना पक्षाच्या वाट्याचा कोटा देणे फारसे कुणाला रुचलेले नाही.

पवारांची नेमकी भूमिका काय

शेट्टी यांच्यासारखा नेता भूमिका घेऊन लढतो याची जाण शरद पवारांना आहे.

कुणी कितीही काहीही म्हटले तरी पवारांनी वाटेल ती किंमत चुकवून माणसांची कदर केलीय आणि अंगावरही घेतलेय.

अण्णा हजारे यांना पवारांनी कायम बेदखल केले.

भारतात एकेकाळी दुसरे 'महात्मा' बनण्याच्या मार्गावर असलेल्या अण्णांना असे बेदखल करणे म्हणजे पापच होते.

ते पाप पवारांनी केले. मात्र, अनेक लोकांना त्यांनी शोधून त्यांचा सन्मान केला,हेही तितकेच खरे.

शेट्टी यांचे राजकारणच मुळात पवार विरोधातून सुरू झाले होते. तरीही पवारांनी सद्यस्थिती ओळखून त्यांच्याशी संबंध सुधारले. राजू शेट्टी आमदारकी साठी पुन्हा पवारांविराोधात जाता की नवी वाट धरतात हे पाहणे गरजेचे आहे.

शेट्टींचे लक्ष विधानसभा

असे असले तरीही राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने घेतलेली भूमिका त्यांच्या आगामी वाटचालीबाबत काही मुद्दे स्पष्ट करते.

यापुढे शेट्टी कुणामागे फरफटत जाणार नाहीत, दुसरे लोकसभे ऐवजी ते विधानसभा लढवतील.

मागेपुढे सदाभाऊ खोत पक्षात आलेच तर त्यांना ते घेतीलही.

जातीचा मुद्दा

शेट्टी यांच्या राजकीय जीवनात आत्तापर्यंत जात आली नव्हती. मात्र, भाजपने ती जाणीवपूर्वक आणून शेट्टींना घाईला आणले.

मराठा विरुद्ध जैन अशी लढाई करून अस्मितेचे राजकारण केले. मात्र, शेट्टीच्या चळवळीने शेतकऱ्यांना कधी जातीत विभागले नाही हेही तितकेच खरे आहे.

बहुतांश मराठा नेत्यांचे कारखाने आणि त्याविरोधात शेट्टी लढतात असा कांगावा अनेकांना केला.

आजही गावोगावचे मराठे शेतकरी ऊसतोडीपासून ते कारखान्याच्या लुटीने हैराण आहेत.

अशा वेळी मराठ्याचा कुठलाही नेता कंबर कसून शेतकऱ्यांची मोठ बांधण्यास पुढे आला नाही हेही तितकेच खरे. राजू शेट्टी यांची आमदारकी ही कळीचा मुद्दा ठरेल हे मात्र खरे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news