माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘पवारांनी किती वेळा दिशा बदलली ?’ | पुढारी

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘पवारांनी किती वेळा दिशा बदलली ?’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा: ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांनी किती वेळा राजकीय दिशा बदलली? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृृहमंत्री अमित शहा यांची पवार भेट का घेतात?’ अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

‘राजू शेट्टी यांनी राजकीय दिशा बदलली,’ असा आरोप करण्यापूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी,शरद पवार यांनी किती वेळा दिशा बदलली हे विचारण्याचे धाडस दाखवावे, असा टोला माजी खा. राजू शेट्टी यांनी लगावला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चावेळी ते बोलत होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘मोर्चा काढताना घाई नको, जीआर वाचा, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, शेट्टी यांनी राजकीय दिशा बदलली, अशी पोकळ विधाने करण्यात पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महिन्याचा वेळ घालवला.

पालकमंत्री पाटील यांनी 17 कोटींची मदत खात्यावर जमा झाल्याचे सांगितले; पण ती गेली कुठे? कुणाच्या खात्यावर ती रक्कम जमा झाली? मंत्री मुश्रीफ हे जिल्ह्यात एकटेच राष्ट्रवादीच्या सत्तेचे लाभार्थी आहेत. बाकीचे सगळे सतरंज्या उचलतात.

एकदा काय ते ठरवा

पालकमंत्री सतेज पाटील म्हणतात, शंभर टक्के पुनर्वसन करू. मंत्री जयंत पाटील सांगतात, पुनर्वसन होणार नाही. तेव्हा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बोलण्यापूर्वी एकत्र बसून काय बोलायचे ते एकदा ठरवावे, असा सल्ला देत शेट्टी म्हणाले, मंत्री मुश्रीफ इथंवर कशी दिशा आणि हवा बदलत पोहोचले ते सांगण्यास भाग पाडू नका.

महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नव्हे, तर मोठा भांडवली खर्च करून ठेकेदारांचे पालनपोषण करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

…तर दिल्लीत आंदोलन करूया

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी रुपये येणे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजधानी दिल्ली येथे आंदोलन घोषित करावे. दोन रेल्वे भरून आंदोलक दिल्लीपर्यंत आणतो. आपण सगळे मिळून आंदोलन करूया, असे सांगत पेट्रोल-डिझेल दरवाढीत केंद्र आणि राज्याच्या कराचा किती वाटा आहे हे जाहीर करा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

Back to top button