

दोनवडे ; पुढारी वृत्तसेवा : 5 सप्टेंबर रोजी होणार्या नियोजित जलसमाधी आंदोलनापूर्वी मदत आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास हजारो शेतकर्यांसह आपण जलसमाधी घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी क्षेत्र प्रयाग येथे बोलताना दिला. पूरग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणखी किती संयम बाळगायचा? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.
पूरग्रस्तांच्या मागण्या आणि मदतीस राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी करवीर तालुक्यातील क्षेत्र प्रयाग चिखली येथील संगमावरून परिक्रमा पदयात्रेस सकाळी दहा वाजता सुरुवात झाली.
महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकर्यांची पीक कर्जमाफी, सानुग्रह अनुदान, घर पडझड नुकसानभरपाई आणि दोन वर्षांपूर्वी शेतकर्यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर पन्नास हजारांचे अनुदान या आणि इतर मागण्यांबाबत 5 सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नृसिंहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.
या पाश्वर्र्भूमीवर 'आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची' या पदयात्रेला प्रारंभ झाला.
बुधवारी पहाटेपासून क्षेत्र प्रयाग येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या शेतकर्यांनी
गर्दी केली होती.
क्षेत्र प्रयाग येथील श्री दत्त मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता राजू शेट्टी यांनी अभिषेक घातला. त्यानंतर पंचगंगा परिक्रमा पदयात्रेस सुरुवात करण्यात आली.
यावेळी झालेल्या सभेत राजू शेट्टी म्हणाले, 2019 साली शेतकर्यांना योग्यवेळी मदत मिळाली; मात्र सध्याच्या सरकारने मदतीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप केला.
पूरग्रस्तांना मदत देण्याबाबत गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्नही त्यांनी केंद्र सरकारला केला.
प्रशासनाचा गलथान कारभार आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळेच पूरग्रस्तांवर अन्याय झाला आहे.
प्रमुख मागण्यांबरोबरच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना फीमाफी, पुलांचे भराव हटवणे, पूरग्रस्तांचे विनाअट कायमस्वरूपी पुनर्वसन या मागण्याही पूरग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा असून, त्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
यावेळी क्षेत्र प्रयाग येथे झालेल्या सभेमध्ये प्रयाग चिखली येथील बाळासाहेब वरुटे यांनी, या आंदोलनासाठी शेतकरी राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहतील, अशी ग्वाही दिली.
रघुनाथ पाटील व माजी सरपंच केवलसिंग रजपूत यांनी गेल्या बत्तीस वर्षांपासून रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी तसेच गुर्हाळ व्यवसायासाठी शेट्टी यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.
करवीर पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी आबिद मुल्लाणी, युवराज पाटील, शामराव मांगलेकर, अरुण मांगलेकर, आंबेवाडीचे माजी सरपंच अनिल आंबी आदी शेतकर्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.
पदयात्रा परिक्रमा प्रयाग चिखलीमार्गे आंबेवाडी, वडणगेकडे रवाना झाली. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, विक्रम पाटील, जनार्दन पाटील, विठ्ठल कळके, सुजित पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सरकार म्हणते, राजू शेट्टी यांनी संयम बाळगावा. अजून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.
आमची लाकडे नदीवर गेली, तरी अजून किती संयम बाळगू. मंत्र्यांनाच माझा सल्ला आहे, तुमची काय ताकद वापरायची ती वापरा; पण आमचा प्रश्न लवकर सोडवा.
प्रयाग चिखलीचे पुनर्वसन होऊन बत्तीस वर्षे उलटली, तरीही अद्याप भूखंडांची प्रॉपर्टी कार्डे मिळालेली नाहीत. यामुळे पुनर्वसन रखडले.
जलसमाधी आंदोलनानंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ आणि प्रॉपर्टी कार्डांची मागणी करू आणि मिळाली नाहीत, तर तेथील खुर्च्या घेऊन येऊ, अशी भूमिका घेतल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असेही शेट्टी म्हणाले.
सभेमध्ये राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला चंद्र-सूर्य नको. आपत्ती निवारण निधीतून थोडी मदत पाहिजे आहे. ती फक्त वेळेत द्या.
एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.