झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे अर्ज | पुढारी

झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे अर्ज

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील औषध निर्माती कंपनी झायडस कॅडिलाने कोरोना वरील लस झायकोव्ह-डी च्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे.

देशातील ५० हून अधिक केंद्रांवर कोरोना लसीसाठी क्लिनिकल ट्रायल करण्यात आले आहे. झायकोव्ह-डी लसीच्या वापराला मंजुरी मिळाली तर प्रौढांसह १२ ते १८ वयोगाटातील मुलांना देखील त्याचा फायदा होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे ही लस दिली जाईल. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

झायकोव्ह-डी या लसीला मंजुरी मिळाली तर, कोरोना रोखण्यासाठी जगातील पहिली डीएनए आधारित ही लस ठरले.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या २ ते १८ वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्ड लसीच्या २ ते १७ वयोगटातील मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी जून मध्ये परवानगी देण्यात आली आहे.

नुकतीच डीसीजीआयने बायोलॉजिकल ई कंपनीच्या ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी असलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली आहे.

या स्वदेशी लसीला काही अटींच्या आधारे पुढील टप्प्यांच्या चाचणीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बायोलॉजिकल ई कंपनीची ही लस ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी असणार आहे.

स्वदेशी बनावटीरच्या लसीची निर्मिती हैदराबादच्या कंपनीकडून करण्यात येत असून त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी मिळाली आहे.

या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशभरातील १० ठिकाणी करण्यात येणार आहे.

डीजीसीआयच्या कोरोनासंबंधी तज्ञ समितीच्या शिफारशीनूसार ही मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button