Gudi Padwa 2024 | जाणून घ्या, यात्रोत्सवानिमित्त शहरात कोठे करण्यात आले वाहतूक मार्गात बदल | पुढारी

Gudi Padwa 2024 | जाणून घ्या, यात्रोत्सवानिमित्त शहरात कोठे करण्यात आले वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या यात्रोत्सवामुळे सातपूरमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी चार ते रात्री दहापर्यंत त्र्यंबक रोडवरून वाहतुकीस मनाई असेल. त्यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत.

यात्रोत्सवामुळे त्र्यंबक रस्त्यावरील सातपूर पोलिस ठाणे ते महिंद्रा सर्कल दुहेरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून सातपूर पोलिस ठाणेसमोरून सातपूर एमआयडीसी रस्त्याने जलतरण तलावाकडून इतरत्र जाऊ शकतील. दरम्यान, पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने या वाहनांना हा निर्बंध लागू नसेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

अतिरिक्त बंदोबस्त
बारा गाड्या यात्रोत्सवाकरिता सातपूर पोलिस ठाण्यासह गुन्हे शोध पथके, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, निर्भया, दामिनी मार्शल्स आणि विशेष शाखा यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. दुपारी तीनपासून बंदोबस्तात तैनात राहणार आहे. यात्रोत्सवात, टवाळखोरी करणाऱ्यांसह भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर असेल. साध्या वेशातीलही पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

हेही वाचा:

Back to top button