धक्कादायक ! जलतरण तलावात बुडून चिमुकल्याचा अंत : वारजे-माळवाडीतील घटना | पुढारी

धक्कादायक ! जलतरण तलावात बुडून चिमुकल्याचा अंत : वारजे-माळवाडीतील घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजेतील एका उच्चभ्रू सोसायटीतील जलतरण तलावात एका 7 वर्षीय चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शिवांश श्याम पठाडे (वय 7) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पठाडे कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शिवांशचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. वारजे माळवाडीतील आदित्य गार्डन सिटी ही बहुमजली सोसायटी आहे, त्या ठिकाणी ते राहतात. सोसायटीत अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये जलतरण तलावही आहे. दरम्यान, आई-वडील दोघे रविवारी मोठ्या मुलीसाठी डेक्कन येथे क्लास शोधण्यासाठी गेले होते. त्या वेळी शिवांश आणि त्याची मोठी बहीण घरी होते. या वेळी मोठ्या बहिणीने शिवांशला स्विमिंग सूट घातला व पुलाच्या बेबी टँकमध्ये सोडले. त्याला बेबी टँकमध्ये सोडून ती घरी आली. तिने त्याला सायंकाळी सहाच्या सुमारास सोडले होते. आई-वडील घरी आले तेव्हा तिने शिवांश याला पोहण्यासाठी बेबी टँकमध्ये सोडल्याचे सांगितले. त्यांनी जाऊन पाहिले असता शिवांश तेथे दिसला नाही. इतरत्र शोध घेतला असता तो बेबी टँकमधून खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पण, त्यापूर्वीच त्याचा बुडून मृत्यू झाला होता. पुढील तपास वारजे पोलिस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button