

इस्लामाबाद : जगभरातील काही ठिकाणे आजही एक रहस्य बनून राहिलेली आहेत. त्यामध्येच पाकिस्तानच्या ताब्यातील हुंजा व्हॅलीचा समावेश होतो. येथे राहणारे हुंजा समुदायाचे लोक अतिशय दीर्घायुष्यी असतात. निसर्गाच्या सान्निध्यात प्रदूषणरहीत वातावरणात राहणार्या या लोकांचे आयुष्य 120 ते 150 वर्षांचेही असते असे म्हटले जाते. खुद्द पाकिस्तानातील लोकांचे सरासरी आयुष्य केवळ 67 वर्षांचे असले तरी हुंजा व्हॅलीतील लोकांचे आयुर्मान अधिक आहे.
हुंजा व्हॅली ही गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हुंजा नावाच्या नदीजवळ आहे. हिमाच्छादित पर्वतांनी वेढलेले हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे. येथे राहणारे लोक एकप्रकारे जगापासून दूरच राहतात. त्यांचे आरोग्य अतिशय चांगले असते व ते सहसा आजारी पडत नाहीत. त्यांच्यामध्ये कर्करोगासारखे घातक आजारही पाहायला मिळत नाहीत.
अगदी उतारवयातही हुंजा समुदायातील स्त्री-पुरुष अपत्यप्राप्ती करू शकतात असे म्हटले जाते. त्यांच्या आहारात भाज्या, दूध, धान्य, फळे असतात आणि ते ग्लेशियरचे स्वच्छ पाणी पितात. खूबानी नावाच्या फळाचे सेवन ते अधिक प्रमाणात करतात. खूबानीच्या बीजांमध्ये एमिग्डालिन आढळते जे 'बी-17' जीवनसत्त्वाचे स्रोत आहे. त्यामुळे कर्करोगासारख्या घातक आजारांपासून संरक्षण होते. येथील लोक कच्ची फळे व भाज्यांचा आहारात वापर करतात व मांसाहार कमी करतात. तेथील स्वच्छ हवा व पाणीही त्यांचे आरोग्य चांगले ठेवते.
हेही वाचलतं का?