सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या सुरक्षिततेशी खेळ ; प्रवेशद्वाराजवळील मेटल डिटेक्टर बनले शोभेच्या वस्तू - पुढारी

सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या सुरक्षिततेशी खेळ ; प्रवेशद्वाराजवळील मेटल डिटेक्टर बनले शोभेच्या वस्तू

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील सुरक्षा व्यवस्था सप्तश्रृंगी भरोसे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. येथे पहिल्या पायरीजवळ असलेल्या दोन मेटल डिटेक्टरपैकी एक बंद तर दुसरे असूनही येथे असलेल्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांची कुठलीच तपासणी होत नसल्याने मेटल डिटेक्टर शोभेची वस्तू बनल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

देवस्थान ट्रस्टकडून येथे दोन मेटल डिटेक्टर बसविण्यात आलेले आहेत. परंतु या मेटल डिटेक्टर ठिकाणी कुठल्याही प्रकारची महिला व पुरुष सुरक्षारक्षक रक्षकांची व्यवस्था नसल्याने या मेटल डिटेक्टरमधून भाविक बिनधास्तपणे आवो जावो घर तुम्हारा या प्रकारे मंदिरात जातात. या ठिकाणी मंदिरात जाताना कुठल्याही प्रकारची भाविकांची तपासणी केली जात नाही. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडे हॅन्ड मेटल डिटेक्टर ही उपलब्ध आहे.

परंतु बर्‍याच वर्षांपासून ट्रस्टचे हॅन्ड मेटल डिटेक्टर गायब झाल्याचे दिसत आहे. कुठे अतिरेकी कारवाया किंवा बॉम्बस्फोट झाले की ट्रस्टला मेटल डिटेक्टरची आठवण येते. तसेच नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवाला मेटल डिटेक्टर यात्रा उत्सव काळात लावले जातात. यात्रा संपली की, परिस्थिती जैसे थे हे मशीन फक्त शोसाठी बसवलेल्या आहे की काय, असा गंभीर प्रश्न भाविकांना पडला आहे.

म ट्रॉलीजवळही तीच स्थिती
सप्तशृंगी गड तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातील लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणी येतात. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने सप्तशृंगगडावरील मंदिराची सुरक्षा व्यवस्था खूपच कमजोर असल्याचे आरोप भाविक करीत आहेत. हीच परिस्थिती फनिक्यूलर रोपवे ट्रॉलीची असून प्रथम दर्शनी गेटवर प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टर बसवलेले आहेत. या ठिकाणीही राम भरोसे असा प्रकार पहायला मिळत आहे. त्यामुळे येथेही मेटल डिटेक्टर असून अडचण नसून खोळंब अशी स्थिती आहे.
आम्ही शिर्डी येथे दर्शनासाठी गेलो असता त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर मधूनच प्रवेश दिला जातो. त्या ठिकाणी प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात सोडले जाते. तंबाखू, सिगरेट, गुटखा अशा पदार्थांना बंदी आहे. परंतु सप्तशृंगगडावर कुठल्याच ठिकाणी भाविकांची तपासणी केली जात नाही. – सुशांत पाटील, भाविक, मुंबई

हेही वाचा :

व्हिडिओ पहा :”लोच्या झाला रे’ सिद्धार्थ जाधवशी खास गप्पा

 

Back to top button