

पुढारी ऑनलाईन: तुम्हाला तुमच्या घरात सौरऊर्जेपासून तयार झालेली वीज वापरायची असेल, तर सरकारने तुमच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे छतावर रूफटॉप सोलर इन्स्टॉल करण्याची परवानगी दिली आहे. तसेच शासकीय योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आणि त्याच्या वितरणासाठी लावलेल्या यंत्रणेचा फक्त फोटो पुरेसा आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, पूर्वी रूफटॉप योजनेंतर्गत योजनेचे लाभ आणि सबसिडी मिळविण्यासाठी कुटुंबांना केवळ नामांकित विक्रेत्यांकडून रूफटॉप सोलर सिस्टीम बसवावी लागत होती. आता ही पद्धत संपुष्टात येणार आहे.
मंत्रालयाच्या निवेदनानुसार, छतावरील सौर योजना सुलभ करण्याचा निर्णय केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 19 जानेवारी 2022 रोजी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. रूफटॉप योजना लोकांना सुलभपणे उपलब्ध व्हावी यासाठी मंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
आता कोणत्याही कुटुंबाला छतावर लिस्टेड दुकानदाराकडूनच सोलर पॅनल बसविण्याची गरज भासणार नाही . लोक त्यांच्या घरांमध्ये रुफटॉप सोलर पॅनेल स्वतः किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून ते स्थापित करू शकतात आणि वितरण कंपनीला सिस्टमच्या फोटोसह स्थापनेबद्दल माहिती देऊ शकतात.
रूफटॉपच्या स्थापनेची माहिती एकतर पत्र/अर्जाद्वारे किंवा वेबसाइटवर दिली जाऊ शकते, जी प्रत्येक डिस्कॉम आणि केंद्र सरकारने रूफटॉप योजनेसाठी सुरू केली आहे. वितरण कंपनी सूचना मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत 'नेट मीटरिंग' उपलब्ध करून दिला जाईल याची खात्री करेल. 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या पॅनेलसाठी 40 टक्के आणि 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेच्या पॅनल्ससाठी 20 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. ते इंस्टॉलेशनच्या 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे घर मालकाच्या खात्यात जमा केले जाते.
सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टरची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार असल्याची खात्री करण्यासाठी, केंद्र सरकार वेळोवेळी सोलर पॅनेल उत्पादक आणि इन्व्हर्टर उत्पादकांची यादी प्रसिद्ध करेल. ज्यांच्या उत्पादनांनी आवश्यक गुणवत्ता मानके पूर्ण केलेली असतील अशाच उत्पादकांचा समावेश असेल. तसेच प्रॉडक्टच्या किमतीची सूची देखील दिली जाईल. त्यानंतर लोक त्यांच्या आवडीचे सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टर निवडू शकतात.
डिस्कॉमने नामनिर्देशित केलेल्या कोणत्याही विक्रेत्यांद्वारे रूफटॉप पॅनेल स्थापित करण्याचा पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असेल. अशा परिस्थितीतही, घरमालक सौर पॅनेल आणि इन्व्हर्टरची स्वतः निवड करू शकतात.