Winery in nashik : वाइन उद्योगांना सरकारकडून व्हॅटचा परतावा ; नाशिकमधील दहा वायनरींना होणार लाभ | पुढारी

Winery in nashik : वाइन उद्योगांना सरकारकडून व्हॅटचा परतावा ; नाशिकमधील दहा वायनरींना होणार लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाइन उद्योगांकडून सरकारला भरण्यात आलेल्या 20 टक्के व्हॅटवर राज्य सरकारच्या उद्योग विभागाने 16 टक्के परतावा म्हणून साडे तेरा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वाइन उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने उपलब्ध रकमेतून 2021-22 या वर्षासाठी हा परतावा दिला आहे. या निधीचा लाभ राज्यातील 13 वायनरींपैकी नाशिकमधील (winery in nashik) दहा वायनरींना होणार आहे.

राज्यातील वाइन उद्योगांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच द्राक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळावे, तसेच उत्पादक शेतकर्‍यांनाही आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरावे याचा विचार करून राज्य सरकारने द्राक्ष प्रक्रिया धोरण-2021 जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील उत्पादीत केलेल्या व अंतिमत: विक्री केलेल्या वाइनच्या विक्रीवर देय असलेला 20 टक्के व्हॅट भरल्यास त्यापैकी 16 टक्के कराच्या रकमेइतके प्रोत्साहन अनुदान वाईन उद्योग देण्याबाबतची योजना सरकारने 31 ऑगस्ट 2008 पासून सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत 2019-20 या आर्थिक वर्षात प्रलंबित असलेले दावे निकाली काढण्यासाठी उद्योग विभागाने 31 कोटी 84 लाख 22 हजार 630 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्याच्या वित्त विभागास प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यातून वित्त विभागने 2021-22 या वर्षासाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी वितरणासाठी उद्योग विभागास उपलब्ध करून दिला आहे. ही रक्कम लवकरच संबंधित वायनरींना प्राप्त होणार आहे.

सरकारडून वाइन उद्योकांची बोळवण
वाइन उद्योगांचा जिल्हा म्हणून नाशिकचा (winery in nashik) लौकीक आहे. तसेच द्राक्षाची पंढरी म्हणूनही नाशिकची सर्वत्र ओळख आहे. अशात वाइन उद्योगांसह द्राक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासन व्हॅट परतावा देते. मात्र 2009 पासून विविध काळातील कोट्यावधी रुपयांचा व्हॅट परतावा अद्याप मिळालेला नसल्याने, सरकारकडून दरवर्षीच वाइन उद्योगांची बोळवण केली जात आहे. यंदा 31 कोटी 84 लाखांचा प्रस्ताव देऊनही वित्त विभागाने 13 कोटी 50 लाख रुपयेच रक्कम मंजूर केली आहे. अद्याप 19 कोटी 34 लाखांची रक्कम सरकारकडून येणे आहे. ही लवकर मिळावी, अशी वाइन उत्पादकांची मागणी आहे.

हेही वाचा:

Back to top button