ऑक्सिजननंतर ‘लोह’ हेच जीवसृष्टीचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व? | पुढारी

ऑक्सिजननंतर ‘लोह’ हेच जीवसृष्टीचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व?

लंडन : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठीच्या एका ‘गुप्त’ तत्त्वाचा शोध घेतला आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की लोह हे एक महत्त्वपूर्ण पोषक तत्त्व आहे. तेच पृथ्वीवरील जवळजवळ सर्व सजीवांच्या विकासासाठी आवश्यक आहे. केवळ वस्तुमानाच्या आधारावर लोह (ऋश) पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात मिळणारे रासायनिक तत्त्व आहे. ऑक्सिजननंतर हेच जीवनासाठी सर्वाधिक गरजेचे तत्त्व आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील या संशोधकांनी म्हटले आहे की लोह हे पृथ्वीच्या स्तरातही चौथ्या क्रमांकाचे सर्वसामान्य तत्त्व आहे. पृथ्वीच्या बहुतांश आंतरिक आणि बाह्य कोअरची निर्मिती लोहतत्त्वामुळेच होते. पृथ्वीच्या मेंटलमध्ये लोहाचे प्रमाण क्रस्ट आणि बाह्य कोअर तसेच सिलिकेट रॉकच्या स्तरादरम्यान आहे. याच घटकांमुळे सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली होती.

त्याचा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या विकासावर मोठाच प्रभाव पडला. लोहाने जटिल जीवन रूपांच्या विकासाला आकार देण्यासाठी मदत केली. ही मदत कशी झाली याबाबतच्या प्रक्रियेचा आता शोध घेण्यात आला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘पीएनएएस’ या विज्ञान नियतकालिकात देण्यात आले आहेत.

या संशोधनामुळे वैज्ञानिकांना अन्य ग्रहांवर विकसित होणार्‍या जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत संशोधनास मदत मिळेल. संशोधक जॉन वेड यांनी सांगितले की ज्या ग्रहाच्या खडकाळ स्तरात लोहाचे प्रमाण कमी असेल तिथे जीवसृष्टीचा विकास होण्याची शक्यताही तितकीच कमी असेल. लोहाच्या मोठ्या प्रमाणामुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी टिकून राहू शकले. जर हे लोह नसते तर मंगळाच्या पृष्ठभागाप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणीही गायब झाले असते!

Back to top button