स्मार्ट वॉचने टिपले सिंहाच्या हृदयाचे ठोके! | पुढारी

स्मार्ट वॉचने टिपले सिंहाच्या हृदयाचे ठोके!

कॅनबेराः हल्ली स्मार्टवॉचचा अनेक लोक वापर करीत असतात. त्याच्या सहाय्याने केवळ वेळच समजते असे नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टीही समजतात. हृदयाचे ठोके, आपण किती पावले चाललो वगैरे गोष्टीही यामधून समजतात. काही लोकांचा जीवही अशा स्मार्ट वॉचमुळे वाचल्याची उदाहरणे आहेत. आता अलीकडेच ऑस्ट्रेलियातील जंगलात स्मार्ट वॉचचा एक महत्त्वाचा प्रयोग करण्यात आला आहे. वन्यजीव पशुवैद्यक डॉक्टर क्लो ब्युटिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, सिंहाच्या हृदयाचे ठोके तपासण्यासाठी स्मार्ट वॉचचा एक अनोखा वापर करून दाखवला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक बेशुद्ध झालेला सिंह जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच हार्ट रेट तपासण्यासाठी त्याच्या जिभेवर काळजीपूर्वक अ‍ॅपल वॉच बांधले आहे आणि घड्याळाची स्क्रीन रिअल-टाईम हेल्थ मेट्रिक्स दाखवते आहे. डॉक्टर क्लो यांनी सांगितले की, त्यांनी आणि डॉक्टर फॅबिओला क्वेसाडा आणि डॉक्टर ब्रेंडन टिंडल यांनी वन्यजीव आरोग्य निरीक्षणासाठी स्मार्ट वॉच वापरण्याची युक्ती शोधली आणि सांगितले की, अनेक उपकरणे प्राण्यांसाठी डिझाईन केलेली आहेत, त्यामुळे त्यांनी वन्यजीवांसाठी स्मार्ट वॉचच्या वापराला ‘गेम चेंजर’ असे संबोधले आहे आणि हे घड्याळ केवळ सिंहांवरच नाही, तर हत्तींवरही काम करते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वन्यजीव पशुवैद्यक डॉक्टर क्लो ब्युटिंग यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, ‘मला माहीत नाही की, आणखी काय प्रभावशाली असू शकते. सिंह या प्राण्याचे घोरणे हार्ट रेट स्मार्ट वॉच मोजू शकते, जर तुम्ही सिहांच्या जिभेला हे स्मार्ट वॉच लावलं तर!’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. एकूणच, डॉक्टरांनी हा नवीन आणि अनोखा शोध लावला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Back to top button