23 वर्षांच्या तरुणीचे 80 वर्षांच्या वृद्धाशी लग्न! | पुढारी

23 वर्षांच्या तरुणीचे 80 वर्षांच्या वृद्धाशी लग्न!

बीजिंग : काही जोड्या पाहिल्या की, ‘रबने बना दी जोडी’ असे म्हणावेसे वाटते! आता चीनमध्ये 23 वर्षांच्या एका तरुणीने 80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीशी लग्न करून सर्वांना चकित केले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून तिने या वृद्ध माणसाशी लग्न केले. दोघांचे रोमँटिक फोटोही आता व्हायरल झाले आहेत!

चीनच्या एका वृद्धाश्रमात काम करणारी तरुणी तिथेच राहणार्‍या या 80 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. दोघांची आधी मैत्री झाली व नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्नही करण्याचे ठरवले. अर्थातच, तिच्या कुटुंबीयांनी या लग्नाला कडाडून विरोध केला; पण तिने ऐकले नाही.

तिला या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि परिपक्व वागणे आवडले होते, तर आजोबांना या तरुणीमधील दयाळूपणा भावला होता. दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केले; पण या लग्नात तिचे कुटुंबीय हजर नव्हते. आता चीनच्या सोशल मीडियात दोघांविषयीची चर्चा रंगली आहे. लोक त्यांच्यामधील वयाच्या अंतरावर टीकाटिप्पणी करीत आहेत. काहींनी त्यांना पाठिंबाही दिलेला असला तरी बहुतेकांना हा प्रकार आवडलेला नाही!

Back to top button