दुबईत बनणार जगातील सर्वात मोठे विमानतळ | पुढारी

दुबईत बनणार जगातील सर्वात मोठे विमानतळ

दुबई : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई नगरी ही आता ‘नवलाईची नगरी’च बनलेली आहे. पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेटं, त्यावरील उत्तुंग इमारती, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती, आखाती देशात फुलवलेली ‘मिरॅकल’ नावाची जगातील सर्वात मोठी फुलबाग, सर्वात खोल स्विमिंग टँक, जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’ यासारख्या अनेक वैशिष्ट्यांनी ही नगरी जगाचे लक्ष वेधून घेत आहे. आता दुबईत जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळही बनणार आहे. सध्याही दुबईचे विमानतळ हे जगातील सर्वात गजबजलेले विमानतळ म्हणून ओळखले जाते. या विमानतळाचा वापर दरवर्षी कोट्यवधी प्रवाशांकडून होतो. आता लवकरच ‘अल

मकतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट’ नावाचे जगातील सर्वात मोठे विमानतळ तिथे पाहायला मिळेल.
या नव्या विमानतळाला दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम यांनी नुकतीच मंजुरी दिली. त्यांनी सांगितले की हे जगातील सर्वात मोठे व भव्य असे विमानतळ असेल. यामध्ये 400 विमानं गेट होतील. या विमानतळाची क्षमता वार्षिक सुमारे 26 कोटी प्रवाशांची असेल. हे विमानतळ नवे ग्लोबल सेंटर बनेल. ते सध्याच्या दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टपेक्षा आकाराने पाचपट अधिक मोठे असेल. भविष्यात या विमानतळावरील सर्व ऑपरेशन नव्या विमानतळाकडे स्थानांतरीत होतील. हे विमानतळ बनण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल.

एका रिपोर्टनुसार हे जगातील सर्वात मोठे विमानतळ बनवण्यासाठी सुमारे 35 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमरो 2.9 लाख कोटी रुपये खर्च होतील. ही इतकी मोठी रक्कम आहे की त्यामध्ये सुमारे दोन डझन ‘बुर्ज खलिफा’ उभे होतील. ‘बुर्ज खलिफा’ ही सर्वात उंच इमारत बांधण्यासाठी 12,500 कोटी रुपये खर्च आला होता. आता दक्षिण दुबईतील या नव्या विमानतळासाठी मोठा खर्च येणार असून त्याच्या चारही बाजूंनी एक शहरच वसवले जाईल. या विमानतळावर पाच रनवे असतील.

Back to top button