चीनमध्ये पुढील वर्षी सुरू होणार स्वयंचलित उडत्या टॅक्सी | पुढारी

चीनमध्ये पुढील वर्षी सुरू होणार स्वयंचलित उडत्या टॅक्सी

बीजिंग : जगात प्रथमच आता एखाद्या कंपनीला उडत्या टॅक्सींची व्यावसायिक निर्मिती करण्यासाठीचा परवाना मिळाला आहे. चीनमध्ये इहांग नावाच्या कंपनीला स्वयंचलित उडत्या टॅक्सींचे उत्पादन करण्यासाठीचे सर्टिफिकेट देण्यात आले आहे. कंपनीच्या या उडत्या टॅक्सींचे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार असून पुढील वर्षीच अशा टॅक्सी चीनच्या आसमंतात उडत असताना पाहायला मिळू शकतात.

ईहांग कंपनीच्या ‘ईएच216-एस’ या उडत्या टॅक्सींमध्ये पायलट असणार नाही. हे एक इलेक्ट्रिक स्वयंचलित वाहन आहे. ते उभ्या स्थितीतच सरळ टेकऑफ व लँडिंग करू शकते. त्यालाच ‘ईव्हीटीओएल’ असे म्हटले जाते. या टॅक्सींच्या मास प्रॉडक्शनला आता सिव्हिल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायनाकडून हिरवा कंदील दर्शवण्यात आला आहे.

आतापर्यंत अनेक कंपन्यांनी अशी वाहने निर्माण केली आहेत. मात्र, त्यांना केवळ चाचण्यांसाठी प्रोटोटाईपच बनवता आलेले आहे. पण, आता या नव्या पावलाने अशा ‘ईव्हीटीओएल’च्या व्यावसायिक उत्पादनाचे नवे दालन खुले झाले आहे. ‘ईहांग’चे सीईओ हुआझी हु यांनी सांगितले की, सुरक्षित आणि विश्वसनीय अशी पायलटलेस ‘ईव्हीटीओएल’ सेवेत आणणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. अशी ‘ईव्हीटीओएल’ जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करून दिली जातील.

Back to top button