इन्सॅट 3 डीएसने पाठवले पृथ्वीचे पहिले छायाचित्र | पुढारी

इन्सॅट 3 डीएसने पाठवले पृथ्वीचे पहिले छायाचित्र

बंगळूर : पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत झाल्यानंतर हवामान उपग्रह इन्सॅट 3 डीएसने अत्याधुनिक पे-लोडच्या माध्यमातून पृथ्वीची काही छायाचित्रे टिपली आहेत. हा उपग्रह 17 फेब्रुवारी रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आला आणि 28 फेब्रुवारी रोजी कक्षेत पोहोचवला गेला होता. 29 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत कक्षेतील आवश्यक चाचण्यांनंतर हा उपग्रह कार्यान्वित करण्यात आला. आपत्कालीन व्यवस्थापन व बचाव मोहीम राबवण्यासाठीही या उपग्रहाच्या माध्यमातून पुरवली जाणारी माहिती महत्त्वपूर्ण ठरू शकते, असा संशोधकांचा होरा आहे.

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने उपग्रह कार्यान्वित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. या उपग्रहाने 7 मार्च रोजी पृथ्वीचे पहिले छायाचित्र घेतले. उपग्रहावरील सर्व पे लोड सर्व निकषावर सर्वसाधारणपणे कार्यरत आहेत. या उपग्रहावर 7 चॅनेल इमेजर व 19 चॅनेल साऊंडर पेलोड आहेत. इन्सॅट 3 डीएसचे पेलोड यापूर्वीचे इन्सॅट 3 डी व इन्सॅट 3 डीआरच्या समसमान आहेत. यामध्ये रेडिओमॅट्रिक अचूकतेसह ब्लॅक बॉडी कॅलिब्रेशन, इमेजिंग आऊटपुट यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या उपग्रहाचे वजन 2274 किलोग्रॅम इतके आहे.

या उपग्रहावरील पेलोड 6 चॅनेल इमेजर पृथ्वीच्या सर्व छटा टिपण्यासाठी सक्षम असून यामुळे आभाळ, तापमान, जल बाष्प व अन्य वायुमंडळीय घटनांबाबत सातत्याने तपशील मिळत राहणार आहेत. याचवेळी 19 चॅनेल साऊंड पेलोड 40 पेक्षाही अधिक जिओ फिजिकल डेटा तयार करणार आहे. या माध्यमातून हवामानाचा अंदाज व जलवायूचे निरीक्षण करणे शक्य होईल, असे प्राथमिक चित्र आहे.

Back to top button