चेहरा, नाव, आवडीनिवडी, मित्र… सार्‍यातच साम्य! | पुढारी

चेहरा, नाव, आवडीनिवडी, मित्र... सार्‍यातच साम्य!

बँकॉक : प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍याचा एक व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे असतोच, असे मानले जाते. पण, असा व्यक्ती आपल्याच समोर आला तर आपली कशी गत होईल, याचा अनुभव मार्क गारलँड नावाच्या दोन व्यक्तींनी घेतला. आश्चर्य म्हणजे या दोन्ही व्यक्तींचे नावही एकच, चेहराही फोटो कॉपीप्रमाणे एकसारखाच, आवडीनिवडीही एकसारख्याच आणि इतके कमी की काय म्हणून त्यांचा मित्रपरिवारही एकसारखाच!

मार्क गारलँड नावाच्या या दोन व्यक्ती बँकॉककडे जात असताना आमनेसामने आल्या आणि क्षणभर त्यांनाच स्वत:वर विश्वास बसला नाही. ते अक्षरश: थक्क झाले. त्या दोघांचेही नाव ‘मार्क गारलँड’ होते. यातील एकजण बस ड्रायव्हर होता, तर एकजण बिल्डर.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 58 वर्षांचा बस ड्रायव्हर मार्क विमानतळावर पोहोचला. पण, विमानतळावर त्याने आधीच चेकइन केले आहे, असे सांगण्यात आले, त्यावेळी तो हैराण झाला. ओळख पटवून आत पोहोचल्यानंतर विमानात असलेली एक व्यक्ती हुबेहूब त्याच्यासारखी दिसते हे त्याला समजले. ती व्यक्ती म्हणजे 63 वर्षांचा बिल्डर मार्क. दोघांचं नाव, चेहरा सारखाच आहे. दोन्ही मार्क एकमेकांना पाहून अर्थातच थक्क झाले.

ड्रायव्हर मार्क म्हणाला, मी 40 मिनिटे चेकइन काऊंटरवर उभा राहिलो. नंतर कन्फ्युझन दूर करण्यासाठी आम्हाला बोर्डिंग गेटपर्यंत जायचे होते. इथेच आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. बिल्डर मार्क म्हणाला, मला याबाबत कधीच माहिती नव्हते. मी डेस्कवर गेलो आणि तिथे एका व्यक्तीला पाहिले, जो माझ्यासारखा दिसतो. तो माझ्यापेक्षा किंचित उंच होता. मी त्याच्यापेक्षा चांगला दिसतो.

नंतर दोघेही विमान प्रवासात साडेअकरा तास एकमेकांसोबत बसले होते. बोलण्याबोलण्यात त्यांना समजले की त्यांच्यातील हे साम्य नाव, चेहर्‍यावरच संपत नाही. त्या दोघांची घरे एकमेकांपासून 15 मैलाच्या अंतरावर आहेत. बिल्डर मार्क कित्येकदा ड्रायव्हर मार्कच्या घराजवळील रस्त्यावरून जातात. दोघांचा एक मित्रही सारखा आहे. दोघांचीही चार मुले आहेत.

Back to top button