न्यूक्लिअर फ्यूजनमधून 12 हजार घरांसाठीची वीज | पुढारी

न्यूक्लिअर फ्यूजनमधून 12 हजार घरांसाठीची वीज

लंडन : सध्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अतिशय वाढले आहे. हवामान बदल, जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर जीवाश्म इंधनांना वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. त्यामध्ये न्यूक्लिअर फ्यूजनच्या माध्यमातून वीज निर्मितीचा पर्यायही आहे. आता ब्रिटनच्या ऑक्सफर्ड शहरामध्ये वैज्ञानिकांनी या माध्यमातून विक्रमी प्रमाणात ऊर्जा निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. ‘जॉईंट युरोपियन टॉरस’ (जेईटी) नावाच्या मशिनमध्ये केवळ 0.2 मिलीग्रॅम इंधनाचा वापर करून पाच सेकंदांसाठी 69 मेगाजूल वीजनिर्मिती करण्यात आली. 1 मेगाजूल म्हणजे 239 किलो कॅलरी. 69 मेगाजूल इतक्या वीजेने 12 हजार घरांना पाच सेकंद प्रकाशित केले जाऊ शकते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी वैज्ञानिकांनी ‘जेईटी’ मशिनला 15 कोटी अंश सेल्सिअसपर्यंत उष्ण केले. हे तापमान सूर्याच्या कोअरपेक्षा सुमारे दहा पटीने अधिक आहे.

न्यूक्लिअर फ्यूजनद्वारे निर्माण केलेल्या ऊर्जेचा हा नवा विक्रम आहे. यापूर्वी 2022 मध्ये वैज्ञानिकांनी अशाच प्रयोगातून 10 मेगाजूल ऊर्जानिर्मिती केली होती. ‘जेईटी’ मशिनला ‘टोकामक’ असेही म्हटले जाते. त्यामध्ये हायड्रोजनचे दोन व्हेरिएंट्स असलेले ड्युटेरियम आणि टायट्रियम टाकण्यात आले. त्यानंतर मशिनचे तापमान 150 दशलक्ष अंश सेल्सिअस इतके वाढवण्यात आले. इतक्या प्रचंड प्रमाणातील उष्णता ड्युटेरियम आणि टायट्रियमला एकमेकांशी जोडण्यासाठी व हेलियम बनवण्यासाठी बाध्य करते.

या प्रक्रियेत प्रचंड मोठी उष्णता निर्माण होते. टोकामकमध्ये मजबूत चुंबक बसवलेले आहेत, जे प्लाझ्माला आत घेतात. त्यानंतर उष्णतेचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. वैज्ञानिक न्यूक्लिअर फ्यूजनला भविष्यातील ऊर्जास्रोत म्हणून पाहतात. जर पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर फ्यूजन करण्यात आले तर जगासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि किफायती ऊर्जा मिळू शकते. ‘फिशन’ म्हणजेच अणुऊर्जा प्रकल्पांमधील प्रक्रियेच्या तुलनेत ‘फ्यूजन’मधून प्रती किलोग्रॅम इंधनापासून चौपट अधिक ऊर्जानिर्मिती होऊ शकते. तेल किंवा कोळशाच्या ज्वलनातून निर्माण होणार्‍या ऊर्जेपेक्षा सुमारे 40 लाखपट अधिक ऊर्जा मिळू शकते.

‘न्यूक्लिअर फ्यूजन’ म्हणजे काय?

न्यूक्लिअर फ्यूजनला ‘नाभिकीय संलयन’ असेही म्हटले जाते. अशाच आण्विक प्रक्रियेतून सूर्य किंवा अन्य तार्‍यांना ऊर्जा मिळत असते. इंटरनॅशनल एटॉमिक एनर्जी एजन्सीच्या माहितीनुसार, न्यूक्लिअर फ्यूजन अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे दोन हलकी अणुंची केंद्रके मिसळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात व एक वजनदार अणू बनतो. अशी प्रक्रिया प्लाझ्माच्या आत होते. सूर्यातील न्यूक्लिअर फ्यूजनमध्ये अणुंना अतिशय उच्च तापमानात म्हणजे सुमारे 10 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमानात एकमेकांशी धडकण्याची गरज असते.

Back to top button