बंद असलेल्या विक्रम लँडरची ‘नासा’ला मदत! | पुढारी

बंद असलेल्या विक्रम लँडरची ‘नासा’ला मदत!

वॉशिंग्टन : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेत विक्रम लँडरचे चांद्रभूमीवर यशस्वी लँडिंग झाले होते. त्यानंतर त्यामधून बाहेर पडून प्रज्ञान रोव्हरनेही चांद्रभूमीवर वावरून नवी निरीक्षणे नोंदवली होती. ही मोहीम केवळ चौदा दिवसांचीच होती. त्यानंतर ही दोन्ही उपकरणे बंद झाली; मात्र आता या बंद असलेल्या विक्रम लँडरने अमेरिकेच्या ‘नासा’ला एका संशोधनासाठी मदत केली आहे. ‘नासा’च्या एका ऑर्बिटरने विक्रम लँडरवर एका उपकरणाच्या साहाय्याने लेसर किरण प्रसारित केले आणि ते तेथून पुन्हा परावर्तित झाले. या प्रयोगाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर टार्गेटचा अचूक छडा लावण्यात यश आले.

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरले होते. या ठिकाणाला आता ‘शिव-शक्ती पॉईंट’ या नावाने ओळखले जाते. त्यामधून बाहेर पडलेल्या प्रज्ञान रोव्हरने चांद्रभूमीवर अनेक प्रयोग केले होते. ‘नासा’ने आता एका निवेदनात म्हटले आहे की, 12 डिसेंबर, 2023 रोजी ‘नासा’च्या लुनार रिकायसन्स ऑर्बिटरने आपल्या लेसर अल्टिमीटर उपकरणाला विक्रम लँडरच्या दिशेने पॉईंट केले. ज्यावेळी लेसर ट्रान्समिट केले गेले, त्यावेळी लँडर एलआरओपासून 100 किलोमीटर दूर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागातील मॅन्जिनस क्रेटरजवळ होते.

ऑर्बिटरने विक्रमवर लावलेल्या नासाच्या एका छोट्या रेट्रोरेफ्लेक्टरवरून परत आलेल्या प्रकाशाची नोंद घेतली. त्यानंतर वैज्ञानिकांना आपले तंत्र यशस्वी झाल्याचे समजले. एखाद्या वस्तूकडे लेसर पल्स पाठवणे ही जमिनीवरून पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहांना ट्रॅक करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत आहे; मात्र चंद्राबाबत उलटी पद्धत वापरली आहे. एखाद्या फिरत असलेल्या ऑर्बिटर किंवा यानातून स्थिर यानावर लेसर पल्स पाठवण्यात आले, जेणेकरून त्याच्या ठिकाणाची अचूक माहिती मिळेल. वैज्ञानिक जियाओली सन यांनी सांगितले की, चंद्राच्या कक्षेतून पृष्ठभागावरील आपल्या रेट्रोरिफ्लेक्टरचा छडा लावता येतो, हे दिसून आले आहे. विक्रम लँडरवरील रेट्रोरिफ्लेक्टर एरेने काम सुरू केले आहे.

Back to top button