हिमालय वाढत असल्याने तिबेटचे होत आहेत दोन भाग | पुढारी

हिमालय वाढत असल्याने तिबेटचे होत आहेत दोन भाग

वॉशिंग्टन : तिबेट हे हिमालयाच्या पठारावर वसलेले आहे. महाद्विपीय प्लेटचे तुकडे हळूहळू वेगळे होत असल्याने तिबेटही दोन भागात विभागले जात असल्याचे आता संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकन जियोफिजिकल युनियनच्या वार्षिक बैठकीत सादर केलेल्या प्री-प्रिंट संशोधनानुसार जगातील सर्वात उंच असलेल्या या पर्वताच्या खालच्या भागातील भूविज्ञान आधीच्या तुलनेत अधिक जटील असू शकते. भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेटस् आपापसात धडकत असल्याने हिमालयाची उंची वाढत आहे. सागरी आणि महाद्विपीय प्लेटांच्या धडकेचा परिणाम भूवैज्ञानिकांनी शोधला आहे.

ज्यावेळी दोन महाद्विपीय प्लेटस् धडकतात, त्यावेळी त्यांच्या परिणामाचे अनुमान लावणे कठीण असते. याचे कारण म्हणजे दोन्हीचे घनत्व समान असते. ज्यावेळी प्लेट सघन असते, त्यावेळी ती ‘सबडक्शन’ नावाच्या प्रक्रियेने हलक्या महाद्विपीय प्लेटच्या खाली सरकते. काही भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, प्लेट अंडरप्लेटिंग नावाच्या प्रक्रियेत युरेशियन प्लेटच्या खाली सरकू शकते. त्यामध्ये एक महाद्विपीय प्लेट मेंटलमध्ये खोलवर गेल्याशिवाय दुसर्‍याच्या खाली सरकते. अन्य काही संशोधकांना वाटते की, भारतीय प्लेटचे अंतर्गत हिस्से झुकू लागले आहेत आणि वरील हिस्से तिबेटच्या मोठ्या हिश्श्यावर दबाव आणत आहेत.

नव्या संशोधनानुसार भारतीय प्लेट ‘सबडक्टिंग’ करीत आहे. अर्थात, असे करीत असताना ती झुकतही आहे आणि फुटतही आहे. तिचा वरील अर्धा हिस्सा टिनच्या डब्याच्या झाकणासारखा निघत आहे. संशोधकांनी क्रस्टमधून जाणार्‍या भूकंप लहरींची तपासणी केली, जिथे दोन प्लेटस् आपापसात धडकतात. या लहरींच्या वापरातून त्यांनी भारतीय प्लेटांच्या स्तराच्या स्लॅबमध्ये भेगा दाखवणार्‍या प्रतिमा बनवल्या. ‘सायन्स’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार काही स्थानांवर भारतीय प्लेटचा खालील हिस्सा 200 किलोमीटर खोल आहे, तर काही ठिकाणी केवळ 100 किलोमीटर खोल आहे. यावरून हे दिसून येते की, भारतीय प्लेटचा काही भाग सोलला गेला आहे.

Back to top button