गुप्त खजिना शोधण्यासाठी घरातच खोदला 130 फुटांचा खोल खड्डा! | पुढारी

गुप्त खजिना शोधण्यासाठी घरातच खोदला 130 फुटांचा खोल खड्डा!

इपाटिंगा-ब्राझील : आपल्याला गुप्त खजिना मिळावा, यासाठी कोण कसा कुठे अट्टाहास धरून बसेल, काहीही सांगता येत नाही. ब्राझीलमधील एका महाभागाने मात्र या सर्वांवरच कडी केली आणि गुप्त खजिना शोधण्याच्या नादात आपल्याच घरात थोड्याथोडक्या नव्हे, तर चक्क 130 फुटांचा खोल खड्डा खणून काढत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता खरोखरच असा काही गुप्त खजिना मिळाला असता, तर त्याच्या परिश्रमाचे सार्थक झालेही असते. पण, इतके करूनही शेवटी काय झाले, हे वेदनादायीच आहे.

ब्राझीलमधील 71 वर्षीय जोआओ पिमेंटा दा सिल्वा असे या व्यक्तीचे नाव आहे. एकदा एका स्वप्नात त्याला स्वयंपाक घरातील फरशीच्या खाली खजिना दडलेला आहे, असे दिसले आणि त्याने इरेला पेटत या खजिन्याचा शोध सुरू केला. प्रारंभी, पाच-एक फूट खाली गेल्यानंतर खजिना हाती येईल, अशी त्याची अटकळ होती. पण, जितका तो खाली खोदत राहिला, तितकी त्याची निराशा होतच राहिली. पण, त्याला गुप्त खजिन्याचा इतका हव्यास लागला होता की, अगदी प्रयत्न सोडून देणेही त्याला जिकिरीचे वाटत आहे. यातून त्याने प्रयत्न न सोडण्याचा निर्धार केला. पण, असे करता करता तो चक्क 130 फुटांपर्यंत खाली खोदत कधी राहिला, हे त्याचे त्यालाही कळले नाही.

प्रारंभी, तो एकटाच हा खड्डा खोदत होता. पण, एकाने करण्यावर बर्‍याच मर्यादा आहेत, याची जाणीव झाल्यानंतर त्याने यासाठी मजूरही घेतले. मजुरांनी देखील नंतर या कामातून अंग काढून घेतले. त्याने हार मानली नव्हती. पण, एकदा अशाच प्रयत्नात तो या खोल खड्ड्यात कोसळला आणि यातच त्याचा अंतही झाला. खजिना तर सापडलाच नाही; पण यासाठी त्याला हकनाक आपला जीव गमवावा लागला असल्याबद्दल त्याच्या शेजार्‍यांनी यावेळी खेद व्यक्त केला.

Back to top button