जुळी मुलं जन्मली दोन वेगवेगळ्या वर्षांत! | पुढारी

जुळी मुलं जन्मली दोन वेगवेगळ्या वर्षांत!

वॉशिंग्टन : नवे वर्ष 31 डिसेंबरच्या मध्यरात्री बाराच्या ठोक्याला सुरू होत असते. या वेळेच्या सीमेवर अनेक गोष्टी घडत असतात; पण त्यामध्ये काही मिनिटांचेच अंतर असले तरी साल बदलते! असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. तिथे जुळी मुलं जन्माला आली; पण ती एकाच वर्षात जन्मली नाहीत. दोघांच्या जन्मामध्ये काही मिनिटांचेच अंतर होते. या काळातच नवे वर्ष सुरू झाले आणि जुळ्यांपैकी एकाचा जन्म नव्या वर्षात झाला!

येल न्यू हेवन हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. येथे जुळ्या मुलांचा जन्म झाला, त्यापैकी एकाचा जन्म 2023 मध्ये झाला आणि दुसर्‍याचा 2024 मध्ये. हॅम्डेन शहरात राहणारे मायकेल आणि आलिया कियोमी मॉरिस नुकतेच पालक झाले. आलियाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. दोघेही जुळे आहेत; परंतु त्यांचा जन्म काही मिनिटांच्या अंतराने झाला होता. सेव्हन मॉरिस असे नाव असलेल्या या मुलाचा जन्म 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजता झाला.

त्याचे वजन सुमारे 3 किलो होते, तर त्याची जुळी बहीण सौली मॉरिस हिचा जन्म 3 मिनिटांनी म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 12.02 वाजता झाला. तिचेही वजन तिच्या भावासारखेच आहे. अशा प्रकारे, येल येथे नवीन वर्षाच्या दिवशी जन्मलेली मुलगी अधिकृतपणे या वर्षीचे तेथील पहिले मूल आहे. दोन्ही मुलं तंदुरुस्त असून आईही बरी असूनस तिला विश्रांती देण्यात येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

Back to top button