अमेरिकेत हरणांच्या ‘झोंबी डियर डिसीज’ने वाढवली चिंता | पुढारी

अमेरिकेत हरणांच्या ‘झोंबी डियर डिसीज’ने वाढवली चिंता

वॉशिंग्टन : चीनमधील न्यूमोनियासारखा गूढ आजार, कोरोनाचे नवे व्हेरिएंट याबाबत चर्चा सुरू असतानाच आता अमेरिकेत ‘झोंबी डियर डिसीज’ नावाच्या आजाराने चिंता वाढवली आहे. अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये या आजाराचा छडा लागला आहे. हा आजार हरणांमध्ये फैलावत असला तरी माणसांमध्येही तो फैलावू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या आजारात विशिष्ट विषाणू मेंदूलाच खातो!

या आजाराला वैज्ञानिकांनी ‘धीम्या गतीने चालणारी आपत्ती’ ठरवले आहे. तेथील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा आजार संपूर्ण अमेरिकेत प्राणीजगतात फैलावत आहे. या आजारावर सध्या कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्याला ‘क्रॉनिक वेस्टिंग डिसीज (सीडब्ल्यूडी) असेही म्हटले जाते. अमेरिकेच्या ‘सीडीसी’ या आरोग्य विभागाने म्हटले आहे की हा एक जुनाच आणि भयावह आजार आहे. तो सर्वात आधी हरीण, एल्क, रेनडियर, सिका हरीण आणि उंदरांमध्ये फैलावतो. त्यामध्ये विषाणू सीडब्ल्यूडी प्रिऑन प्राण्यांचा मेंदू खातो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. हा विषाणू प्राणी आणि मानव अशा दोघांनाही संक्रमित करू शकतो. अर्थात तो मानवाला संक्रमित करू शकतो याचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या आजारात मेंदू आणि मणक्याच्या हाडांमधील पेशी अनैसर्गिकरीत्या वाकून एकमेकींना चिकटू लागतात.

संक्रमित झाल्यानंतर सुमारे वर्षभराने प्राण्यांमध्ये मनोभ्रंश, लडखडणे, लाळ येणे, आक्रमकता आणि वजन घटणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर हळूहळू ती मृत्यूचे कारण बनतात. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार झोंबी डियर डिसीजचे पहिले प्रकरण 1967 मध्ये कोलोरॅडोत आढळले होते. जे लोक अशा संक्रमित प्राण्यांचे मांस खातात त्यांना हा आजार होण्याचा धोका संभवतो. असे मांस शिजवले तरी त्यामधील विषाणू मरत नसल्याने हा धोका निर्माण होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. प्राण्यांमध्ये त्याचे संक्रमण लाळ, मूत्र, मल आणि रक्ताच्या माध्यमातून होते.

* अमेरिकेतील 31 राज्यांसह कॅनडाच्या तीन प्रांतांत हरीण व उंदरांमध्ये फैलाव

* नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि दक्षिण कोरियातही अशी प्रकरणे आढळली

* प्राण्यांमधील या धोकादायक आजारावर औषध नाही

* माणसामध्येही संक्रमित होऊ शकतो असा इशारा

Back to top button