Bhagavad Gita : ‘या’ ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितली होती गीता! | पुढारी

Bhagavad Gita : ‘या’ ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितली होती गीता!

चंदिगढ : श्रीमद् भगवद्गीता (Bhagavad Gita) ही हजारो वर्षांपासून भाविकांना ज्ञानदान करीत आलेली आहे. महाभारताच्या भीष्मपर्वात सातशे श्लोक व अठरा अध्यायांमधून हे ज्ञान दिले गेले. भारतीय युद्धाच्या ऐन प्रारंभावेळीच किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान दिले व त्याचा मोह, अज्ञान दूर केले. हाच श्रीकृष्णार्जुन संवाद आजही जगभरातील असंख्य लोकांचे अज्ञान दूर करीत आहे. हा अजरामर संवाद कुठे घडला याची तुम्हाला माहिती आहे का? हरियाणात कुरुक्षेत्र हे पवित्र स्थळ आहे. या कुरुक्षेत्रावरील ज्योतिसर नावाच्या स्थळी हा संवाद घडला, असे परंपरेने मानले जाते. तेथील एका मोठ्या वटवृक्षाखाली रथाचे सारथ्य करीत असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा गीतोपदेश केला. (Bhagavad Gita)

ज्योतिसर हे स्थळ ज्योतिसर या नावाने प्रसिद्ध असलेल्या पवित्र सरोवराच्या काठी आहे. ज्योतिसर याच स्थळी श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश केला, असे आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी सांगितले होते. श्रीकृष्णाच्या चरित्राशी संबंधित असलेल्या स्थळांमध्ये या पवित्र स्थळाचाही समावेश होतो. मथुरा, गोकुळ, वृंदावन, बरसाना, गोवर्धन, द्वारका व श्रीकृष्ण निर्वाणाचे भालकातीर्थ अशी ही स्थळे आहेत. कुरुक्षेत्राच्या ज्योतिसर येथे गीता (Bhagavad Gita) सांगितल्याने हे स्थळही परमपवित्र व पूजनीय ठरले. सध्या त्या ठिकाणी जो वटवृक्ष आहे, तो महाभारताच्या काळातील वटवृक्षाचाच वंशज असल्याचे म्हटले जाते. (Bhagavad Gita)

या तीर्थस्थळी श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर आहे. तसेच धरोहर म्युझियम, कुरुक्षेत्र पॅनोरामा अँड सायन्स सेंटर, श्रीकृष्ण म्युझियम आहे. गीतोपदेशाच्या ठिकाणी रथात बसून अर्जुनाला उपदेश करणार्‍या श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशीला गीता जयंती असते. त्यानिमित्त याठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात. यावर्षी शुक्रवारी गीता जयंती असून, कुरुक्षेत्रावर, ज्योतिसर तीर्थस्थळी विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.

Back to top button