‘या’ ग्रहावर पडतो वाळूचा पाऊस! | पुढारी

‘या’ ग्रहावर पडतो वाळूचा पाऊस!

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अफाट पसार्‍यात अनेक ग्रह-तारे आहेत. सगळेच ग्रह व तेथील स्थिती आपल्या पृथ्वीसारखी असेल असे नसते. कुठे चक्क हिर्‍यांचा पाऊस पडतो तर कुठे लोखंडाचा. अर्थात हे हिरे किंवा लोखंड त्यांच्या मूळ रासायनिक स्वरूपात असतात. असाच एक ग्रह आता ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शोधला आहे, जिथे चक्क वाळूचा पाऊस पडतो. ‘व्हास्प-107 बी’ असे या ग्रहाचे नाव आहे. त्याच्यावर सिलिकेट सँडच्या ढगांचे अस्तित्व असते.

हा ग्रह अशा ठिकाणी आहे जिथे ब्रह्मांडाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यावहिल्या आकाशगंगा निर्माण होत होत्या. अशा दूरस्थ ठिकाणी असलेल्या ग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी जेम्स वेब या अंतराळ दुर्बिणीने बराच वेळ घेतला. तेथील अनेक ग्रहांचे वातावरण हे आश्चर्यकारक असते. जेम्स वेब दुर्बिणीने पाठवलेल्या डेटाचा काही युरोपियन खगोलशास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यांनी असेच विचित्र वातावरण असलेल्या या ‘व्हास्प-107 बी’ नावाच्या बाह्यग्रहाचा अभ्यास केला. या ग्रहाच्या वातावरणात पाण्याची बाष्प, सल्फर डायऑक्साईड आणि अगदी सिलिकेट सँडचे ढगही असल्याचे दिसून आले. अतिशय कमी घनता असलेल्या ग्रहांपैकी हा एक आहे.

एखाद्या धूमकेतूसारखी त्याची घनता आहे. मात्र, हा ग्रह आपल्या ग्रहमालिकेतील गुरू ग्रहाइतक्या आकाराचा आहे. अर्थात गुरू ग्रहाच्या वस्तुमानापैकी केवळ बारा टक्के वस्तुमानच या ग्रहाचे आहे. हा बाह्यग्रह पृथ्वीपासून 200 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याला त्याच्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केवळ सहा दिवस लागतात. याचा अर्थ त्याच्यावरील वर्ष अवघ्या सहा दिवसांचेच असते! हा तारा आपल्या सूर्याच्या तुलनेने कमी उष्ण आणि लहान आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे पाण्याचे बाष्प आणि ढग असतात, तसेच या ग्रहावरही असतात; मात्र त्यावर वाळू असलेले थेंबही असतात. ज्यावेळी हे थेंब घनीभूत होऊन खाली कोसळतात, त्यावेळी ते या ग्रहाच्या अतिशय उष्ण स्तरात प्रवेश करतात जिथे त्यांचे रूपांतर सिलिकेट व्हेपरमध्ये म्हणजेच सिलिकेटच्या बाष्पात होते व त्यामुळे ते पुन्हा जेथून आले तिथे परत जातात!

Back to top button