ozone layer : ओझोनच्या स्तरातील छिद्र बनले अमेरिकेपेक्षाही मोठे | पुढारी

ozone layer : ओझोनच्या स्तरातील छिद्र बनले अमेरिकेपेक्षाही मोठे

लंडनः अंटार्क्टिका खंडावर ओझोनच्या स्तरात बनलेले छिद्र आता अतिशय मोठ्या आकाराचे झाल्याचे सॅटेलाईट डाटामधून स्पष्ट झाले आहे. ते उत्तर अमेरिकेपेक्षाही मोठे झाल्याचे 16 सप्टेंबरला दिसून आले आहे. टोंगामध्ये पाण्याखालील ज्वालामुखीचा गेल्या वर्षी उद्रेक झाला होता. त्याला याबाबत काहीअंशी दोष देता येऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

ओझोनच्या छिद्रातील सर्वात मोठ्या वाढींपैकी एक वाढ यंदा पाहायला मिळत आहे. ओझोनचा स्तरच पृथ्वीला सूर्याच्या घातक किरणांपासून वाचवत असतो. हा स्तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 15 ते 30 किलोमीटर उंचीवर आहे. ज्याठिकाणी ओझोनची घनता अधिक असते तिथे ऑक्सिजनच्या रेणूमध्ये दोनऐवजी तीन अणू असतात. सूर्यप्रकाशातील घातक अशा ‘अल्ट्राव्हायोलेट रेज’ म्हणजेच अतिनील किरणांपासून हा स्तर संरक्षण करीत असतो. मानवासह सर्व जीवसृष्टीला हे संरक्षण आवश्यक असते. या स्तरात ध्रुवीय भागांवर मोठी छिद्रे बनतात, असे 1985 मध्ये आढळून आले होते.

ते भरून यावे यासाठी 1989 पासून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले. मात्र, प्रत्येक गोलार्धातील हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये ज्यावेळी थंड हवेने ‘पोलर स्ट्रॅटोस्फिरीक क्लाऊडस्’ (पीएससी) बनतात त्यावेळी असे छिद्र बनणे सुरूच राहिले. हे अत्याधिक उंचीवरील ढग असतात जे बर्फाच्या सूक्ष्म अशा स्फटिकांनी बनलेले असतात. त्यांच्यामुळे असे छिद्र निर्माण होते. अंटार्क्टिकाच्या वरील बाजूसही या स्तरात छिद्र बनलेले आहे. त्याचा आकार वेळोवेळी लहान-मोठा होत असतो. यावर्षी या छिद्राचा आकार अतिशय मोठा झाला आहे. तो 26 दशलक्ष चौरस किलोमीटरचा असल्याचे युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे. हा आकार उत्तर अमेरिका खंडाइतका, ब्राझीलपेक्षा तिप्पट मोठा तसेच खुद्द अंटार्क्टिकापेक्षा दुप्पट आकाराचा आहे.

Back to top button