लघुग्रहावरील मातीच्या माध्यमातून उलगडणार सौर मंडळाचे रहस्य! | पुढारी

लघुग्रहावरील मातीच्या माध्यमातून उलगडणार सौर मंडळाचे रहस्य!

वॉशिंग्टन : सौर मंडळातील कोट्यवधी किलोमीटर्सचा प्रवास केल्यानंतर नासाचे एक कॅप्सूल ओसिरीस रेक्स 24 सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतत आहे. पृथ्वी व मंगळाच्या मधोमध असलेल्या बेन्नू या लघुग्रहावरील माती व दगडाचे काही नमुने आणण्यासाठी हे कॅप्सूल पाठवण्यात आले होते. आता हे कॅप्सूल सदर नमुने घेऊन आल्यानंतर त्याच्या अभ्यासातून सौर मंडळातील काही रहस्ये उलगडता येतील, असा अभ्यासकांचा होरा आहे. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 7.83 कोटी किलोमीटर्सवर आहे.

ओसिरीस रेक्सचे पूर्ण नाव ओरिजिंस, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन अँड सिक्युरिटी रिगोलिथ एक्स्प्लोरर असे आहे. नासाची ही पहिलीच मोहीम आहे, ज्यात लघुग्रहावरील नमुने आणण्यासाठी ते पाठवले गेले असेल. ऑक्टोबर 2020 मध्ये बेन्नू लघुग्रहावरून नमुने एकत्रित केले. आश्चर्य म्हणजे त्या वेळेपासून त्याचा पृथ्वीकडील प्रवास सुरू आहे. ओसिरीस रेक्स आपल्यासह 250 ग्रॅम दगड-मातीचे नमुने घेऊन येत असून या नमुन्यांची चाचणी जगभरातील संशोधक करणार आहेत. यामुळे आपले सौर मंडळ व त्याची वाटचाल याबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते, असा होरा आहे. असे मानले जाते की, बेन्नू सारख्या कार्बनयुक्त लघुग्रहांनी पृथ्वीवर जीवसृष्टी वसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ओसिरीस रेक्स कॅप्सूल ज्वालामुखीपेक्षा अधिक तापमान सोसू शकते, अशी त्याची रचना आहे. तो वायुमंडळात घुसणारा दुसरा सर्वात जलद कॅप्सूल आहे. 45 किलोग्रॅम वजनाचे हे कॅप्सूल आता अंतराळातून हायपरसॉनिक वेगाने प्रवास करत पृथ्वीकडे कूच करत आहे. त्याला हिटशिल्डचे कवच असून यामुळे कितीही उष्णतेपासून त्याचा बचाव होऊ शकतो.

नासाने दिलेल्या माहितीनुसार कॅप्सूल आपल्या पॅराशूटसह 58 x 14 किलोमीटरमधील कोणत्याही क्षेत्रात उतरू शकते. कॅप्सूल लँड होत असताना हवामानाचा अंदाज घेण्यासाठी 60 हजार फुटांवर एक वेदर बलून देखील तैनात असणार आहे. याशिवाय, हेलिकॉप्टर, वाहने व इंजिनिअरचे पथक येथे पाचारण केले जाणार आहे.

Back to top button