black hole : कृष्णविवराने गिळला सूर्याइतका मोठा तारा | पुढारी

black hole : कृष्णविवराने गिळला सूर्याइतका मोठा तारा

लंडन : पृथ्वीपासून सुमारे 500 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर एक कृष्णविवर आपल्या सौरमालिकेच्या सूर्याइतक्या आकाराच्या तार्‍याला गिळंकृत करीत असताना आढळून आले आहे. या नाट्यमय घटनेमुळे दर 25 दिवसांनी प्रकाशाचा नियमित स्फोटही होत आहे. लिसेस्टर विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांनी या घटनेचा छडा लावला आहे.

ज्यावेळी एखादा तारा कृष्णविवरात सामावला जातो त्यावेळी कृष्णविवरामध्ये स्फोट होत असताना दिसून येतात. मात्र, वारंवार प्रकाशाचे उत्सर्जन होत असेल तर त्याचा अर्थ तारा अंशतः नष्ट होत आहे. संशोधकांच्या मते, ज्या घटनांमध्ये वारंवार स्फोट होतो, त्यामध्ये दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे जे दरवर्षी होतात आणि दुसरा ज्यामध्ये काही तासांच्या अंतराने स्फोट होतात. लिसेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की तारा वारंवार तुटण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रकाश उत्सर्जनाची घटना 25 दिवसांमध्ये एकदा होत होती.

या तार्‍याला ‘स्विफ्ट जे0230’ असे नाव देण्यात आले आहे. तो अपेक्षेप्रमाणे घट होण्याऐवजी 7 ते दहा दिवसांसाठी चमकणे सुरू करीत होता. नंतर अचानक त्याचे चमकणे थांबत असे. या प्रक्रियेची दर 25 दिवसांनी पुनरावृत्ती होत होती. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधक डॉ. रॉबर्ट आइल्स-फेरिस यांनी सांगितले की भूतकाळात आम्ही ज्या प्रणाली पाहिल्या आहेत, त्यामधील बहुतांशांमध्ये तारा पूर्णपणे नष्ट झाला होता. मात्र, ‘स्विफ्ट जे 0230’ अंशतः नष्ट होत आहे. ही एक रोमांचक घटना आहे.

Back to top button