दोनपेक्षा अधिक भाषा जाणल्याने स्मरणशक्ती होते मजबूत | पुढारी

दोनपेक्षा अधिक भाषा जाणल्याने स्मरणशक्ती होते मजबूत

वॉशिंग्टन : आपल्याला जितक्या अधिक भाषांचे ज्ञान असेल तितकी तुमची स्मरणशक्ती अधिक मजबूत आणि तीक्ष्ण होईल. त्याचा परिणाम म्हणून विस्मरणाचे आजार तुमच्यापासून दूर राहतील, असे संशोधकांनी म्हटले आहे. ज्यावेळी आपण एक भाषा बोलता बोलता मध्येच दुसरी भाषाही बोलू लागतो, त्यावेळी मेंदूचे ‘मेमरी हब’ असे मानल्या जाणार्‍या ‘हिप्पोकॅम्पस’कडून विशेष नियंत्रणाचे प्रदर्शन घडत असते.

समजा जर एखादा माणूस मराठी किंवा हिंदीतून बोलत असेल आणि त्याला समोरच्या माणसाला इंग्रजीही येते हे ठावूक असेल तर तो अधुनमधून काही इंग्रजी वाक्येही बोलत असतो. याशिवाय आपण घरात एक भाषा, बाहेर दुसरी भाषा, कामाच्या ठिकाणी तिसरी भाषा असा भाषेचा वापरही करीत असतो. त्यामुळे दिवसभरात मेंदूच्या हिप्पोकॅम्पसची चांगलीच कसरतही होत असते. या कसरतीमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते आणि स्मरणशक्तीही दीर्घकाळ शाबूत राहते. संशोधकांच्या मते, भाषा या मेंदूला सक्रिय करीत असतात. त्या मेंदूचा विकासही घडवण्यास मदत करतात.

ज्यावेळी आपण एखादी भाषा बोलत असतो त्यावेळी मेंदूचा बराचसा हिस्सा यामध्ये सक्रिय असतो. त्यामुळे स्मरणशक्तीही मजबूत होत राहते. एका पाहणीत 59 ते 76 वर्षे वयाच्या 746 लोकांना समाविष्ट करण्यात आले. त्यापैकी सुमारे 40 टक्के लोकांमध्ये स्मरणशक्तीबाबत कोणतीही समस्या नव्हती. अन्य लोक भ्रम किंवा स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येने ग्रस्त होते. एकच भाषा जाणणार्‍या लोकांच्या तुलनेत दोन भाषा जाणणार्‍या लोकांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता अधिक असल्याचे दिसून आले.

Back to top button