कर्करोगावर लस बनवल्याचा ब्रिटिश संशोधकांचा दावा | पुढारी

कर्करोगावर लस बनवल्याचा ब्रिटिश संशोधकांचा दावा

लंडन : जगातील भयावह आणि प्राणघातक आजारांमध्ये कर्करोगाचा समावेश होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार असतात. त्यांचे वेळीच निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते व रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यताही वाढते. कर्करोगावर अनेक प्रकारे उपचार केले जातात. त्यामध्ये किमोथेरपीसारख्या उपचारांचा समावेश आहे. आता ब्रिटनच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ने कर्करोगावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ही लस घेतल्यास कर्करोगावरील उपचाराचा कालावधी तीन चतुर्थांश कमी होईल असा दावा आहे. ही लस देण्यास फक्त सात मिनिटांचा कालावधी लागतो. जगभरात करोडो लोक कर्करोगामुळे आपला जीव गमावत असताना, नॅशनल हेल्थ सर्व्हिसची ही लस रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसने आपल्या एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, औषधं आणि आरोग्य सुरक्षा उत्पादन नियंत्रक संस्थेने या लसीला मान्यता दिली आहे. सध्या कॅन्सर रुग्णांना इम्युनोथेरपी अझेझोलिझुमॅब दिली जाते, जी देण्यासाठी अर्धा ते एक तास लागू शकतो. निवेदनानुसार, नवीन कॅन्सरविरोधी लस कमी वेळेत दिली जाऊ शकते आणि रुग्णांना होणार त्रास कमी होईल.

यामुळे उपचारातील वेळही वाचेल. वैद्यकीय अहवालानुसार एटेझोलिझुमॅब हे आरओजी एस कंपनी जेनेंटेकद्वारे निर्मिती करण्यात आलेले इंजेक्शन आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या पेशी शोधून नष्ट करण्यास मदत करते. आरोग्यतज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे की, एनएचएसच्या रुग्णांना सध्या फुफ्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयासह रक्तसंक्रमणाद्वारे उपचार दिले जातात.

एनएचएस इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी एटेझोलिझुमॅबवर उपचार सुरू करणार्‍या सुमारे 3600 रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण वेळ वाचवणार्‍या या इंजेक्शनची निवड करतील अशी आशा आहे. जगभरात लोकांचा मृत्यू होण्यातील प्रमुख कारणांमध्ये कॅन्सर दुसर्‍या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी कर्करोगाचे 1 कोटी नवी प्रकरणे समोर येतात. दरम्यान, भारताबद्दल बोलायचे गेल्यास आपल्याकडे कोटींहून अधिक प्रकरणांची नोंद होते. भारतात खासकरून 6 प्रकारचे कॅन्सर रुग्ण आढळतात. यामध्ये फुफ्फुसांचा, तोंडाचा, पोटाचा, स्तनांचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर यांचा समावेश आहे.

Back to top button