माणसाइतक्या मोठ्या सागरी सरड्याचे जीवाश्म | पुढारी

माणसाइतक्या मोठ्या सागरी सरड्याचे जीवाश्म

बीजिंग : तब्बल 25 कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या दक्षिण चीनच्या परिसरात हाडांचे चिलखती आवरण असलेला सागरी सरडा वावरत होता. या प्राचीन सरीसृपाचे जीवाश्म आता शोधण्यात आले आहे. समुद्रातील उथळ पाण्यात असे सरडे होते. या जीवाश्माच्या अभ्यासामुळे आता असे चिलखती आवरण असलेल्या सागरी सरीसृपांचा वंशवृक्ष नव्याने तयार करण्यास चालना मिळेल. या सागरी सरड्यांचा आकार एखाद्या माणसाइतका मोठा होता.

या प्रजातीचे नाव आहे ‘प्रोसॉरोस्फेर्जिस यिंगझिशानेन्सिस’ असे आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील यिंगझिशान येथे 2019 मध्ये त्याचे जीवाश्म सापडले होते. त्यामध्ये अंशतः शिल्लक राहिलेल्या सांगाड्याचा समावेश होता. त्यावेळेपासूनच या जीवाश्माचा अभ्यास केला जात होता. त्याची माहिती आता संशोधकांनी दिलेली आहे. पी. यिंगझिशानेन्सिस ही ‘सॉरोस्फेर्जिडी’ या कुळातील प्रजाती आहे. चिलखती त्वचेच्या सागरी सरीसृपांचे हे कुळ आहे. या कुळातील प्राण्यांच्या पृष्ठीय बरगड्या रुंद होत्या.

त्यामुळे हे सरीसृप अन्य सागरी सरीसृपांच्या तुलनेत लठ्ठ दिसत होते. ‘सॉरोस्फेर्गिडी’ हा शब्द सरड्यांसाठी असलेला ‘सॉरोस’ हा ग्रीक शब्द व लिथरबॅक कासवांसाठीच्या ‘स्फेर्जिस’ या शब्दांच्या मिलाफातून बनला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘इव्होल्युशनरी बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे ‘पी. यिंगझिशानेन्सिस’ प्राणी 5 फुटांपर्यंत वाढत असत. चिलखती डायनासोर किंवा अन्य काही सरीसृपांप्रमाणेच त्यांची त्वचा जाड, खवले आणि पट्टे असलेली होती. ते सर्वात मोठ्या सागरी सरीसृपांपैकी एक होते, अशी माहिती चीनमधील हेफेई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील पॅलियोबायोलॉजिस्ट अँड्रजेझ वोल्नीविक्झ यांनी सांगितले.

Back to top button