‘या’ दरीत दगड ‘चालतात’!

‘या’ दरीत दगड ‘चालतात’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ही दुनिया खरोखरच कल्पनेपेक्षाही आश्चर्यकारक आहे. निसर्गाची अनेक अनोखी द़ृश्ये या जगात पाहायला मिळत असतात. असेच एक अनोखे द़ृश्य अमेरिकेत पाहायला मिळते. पूर्व कॅलिफोर्नियामध्ये 'डेथ व्हॅली' या नावाची एक वाळवंटी दरी आहे. या दरीत दगड असे आपोआप पुढे गेल्याचे आढळते. ही एक नैसर्गिक घटना असून त्यामध्ये दगड वाळवंटी भागातील सपाट पृष्ठभागावरून पुढे सरकत जातात व त्यामुळे त्यांच्या मागे सरकण्याच्या मार्गाचा एक पट्टाच तयार होतो. जणू काही हे दगड चालत जात असावेत असा भास हे द़ृश्य पाहून होतो!

डेथ व्हॅली हा पूर्व मोजाव वाळवंटाचा एक भाग आहे. दोन पर्वतरांगांच्या दरम्यान ही अनोखी दरी असून हे जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. ते तब्बल 225 किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे. या ठिकाणी उच्च तापमानाचे अनेक विक्रम होत असतात. त्यामुळेही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मात्र, त्याची सर्वाधिक प्रसिद्धी ही तेथील 'रेसट्रॅक प्लाया' या नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणच्या अशा सरकत पुढे जाणार्‍या दगडांमुळेच आहे. हे सरकणारे दगड आपल्या मागे जमिनीवर एक मोठी विस्तृत रेषा सोडतात. या खुणेमुळेच हे दगड आपल्या जागेवरून पुढे सरकत आल्याचे समजते. अर्थात ही पुढे सरकण्याची क्रिया अत्यंत मंद असल्याने कुणी त्यांना पुढे सरकत जात असताना प्रत्यक्ष पाहिलेले नाही.

संशोधकांनी या दगडांबाबत बरेच संशोधन केले आहे. 1972 मध्ये या 'चालणार्‍या दगडां'चे रहस्य उलगडण्यासाठी संशोधकांचे एक पथक त्याठिकाणी गेले. त्यांनी या दगडांचे तब्बल सात वर्षे निरीक्षण केले. तेथील 317 किलो वजनाच्या एका दगडावर त्यांनी विशेष लक्ष ठेवले होते. त्यांच्या संशोधनाच्या काळात हा दगड इंचभरही हलला नाही. मात्र, काही वर्षांनी ज्यावेळी हे संशोधक पुन्हा तिथे गेले त्यावेळी तो सुमारे एक किलोमीटर पुढे सरकल्याचे दिसून आले. ते पाहून अनेक वैज्ञानिक थक्क झाले. काही संशोधकांच्या मते, हे दगड वेगवान वार्‍यामुळे असे पुढे सरकतात.

या दगडांच्या सरकण्याच्या कारणांबाबत संशोधकांमध्ये एकमत नाही. स्पेनमधील कम्प्लूटेंस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की येथील मातीमध्ये असलेल्या सूक्ष्म जीवांमुळे हा प्रकार घडतो. हे सूक्ष्म जीव मातीला गुळगुळीत बनवतात व त्यामुळे दगड पुढे घसरतात. काही संशोधकांच्या मते, हिवाळ्यामध्ये या ठिकाणी असलेले तापमान अतिशय कमी होते व त्यामुळे तेथील पृष्ठभागावर बर्फाचा अत्यंत पातळ स्तर निर्माण होतो. हा स्तर सूर्यप्रकाशात वितळू लागल्यावर हे दगड पुढे घसरतात. हे दगड 'सेलिंग स्टोन', 'स्लायडिंग स्टोन', 'वॉकिंग स्टोन', 'रोलिंग स्टोन' अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news