जिभेवर उगवले हिरवे केस! | पुढारी

जिभेवर उगवले हिरवे केस!

लंडन : काही दिवसांपूर्वी जिभेवर काळे केस उगवलेल्या रुग्णाचे वृत्त आले होते. आता इंग्लंडमधील एका व्यक्तीबाबत असाच प्रकार घडला असून त्याच्या जिभेवर काळे नव्हे तर चक्क हिरवे केस किंवा रोम उगवलेले आहेत. या स्थितीला ‘हेअरी टंग’ असे म्हटले जाते. अनेक लोकांबाबत असा प्रकार घडू शकतो व तुलनेने तो निरुपद्रवी असतो.

दोन आठवड्यांपूर्वी ‘गम इन्फेक्शन’वरील औषधांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याच्याबाबत हा प्रकार घडला. ही व्यक्ती 64 वर्षे वयाची आहे. सुरुवातीला डॉक्टरांना हा प्रकार ‘ओरल थ्रश’चा म्हणजे तोंडातील बुरशी संसर्गाचा वाटला. त्यांनी त्याच्यावर अँटीफंगल ट्रिटमेंट केली. मात्र, गवतासारखे उगवून आलेल्या जिभेवरील हिरव्या केसांवर त्याचा परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी त्याची अधिक तपासणी केली. या रुग्णाला वेदना होत नव्हत्या की जिभेच्या चव घेण्याच्या क्षमतेतही फरक पडलेला नव्हता. हा ‘हेअरी टंग’ किंवा ‘लिंगुआ व्हिलोसा’ नावाचा प्रकार असल्याचे आढळून आले.

या विकारात जीभेवर वेगवेगळ्या रंगाचे केस उगवून येत असतात. हे जिभेवरील केस 1 मिलीमीटर उंचीपर्यंत वाढू शकतात व त्यानंतर वाळलेली त्वचा किंवा खपली गळून पडावी तसे ते गळून पडतात. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ ओरल मेडिसिनच्या संशोधकांनी म्हटले आहे की हे केस 18 मिलीमीटरपर्यंतही वाढू शकतात. हा प्रकार 13 टक्के लोकांबाबत घडू शकतो. विशेषतः पुरुषांमध्ये आणि त्यामध्येही 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पुरुषांमध्ये असे प्रकार अधिक घडतात.

Back to top button