ओडिशामध्ये बातम्या सांगणार ‘व्हर्च्युअल’ वृत्तनिवेदिका | पुढारी

ओडिशामध्ये बातम्या सांगणार ‘व्हर्च्युअल’ वृत्तनिवेदिका

भुवनेश्वर ः जगात सर्वात प्रथम चीनमध्ये ‘व्हर्च्युअल न्यूजअँकर’चा प्रयोग करण्यात आला होता. ‘झिन्हुआ’ने असा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिला वृत्तनिवेदक सादर केला. आता भारतातही असा प्रयोग करण्यात आला आहे. ओडिशामध्ये एका खासगी वृत्तवाहिनीने ‘एआय’वर आधारित एक व्हर्च्युअल न्यूज अँकर लाँच केली आहे.

कंपनीने जारी केलेल्या व्हिडीओत दिसते की तिने ओडिशाची हँडलूम साडी परिधान केली आहे. ती ओटीव्ही नेटवर्कच्या टी.व्ही. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओडिया व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत बातम्या सांगत आहे. या आभासी वृत्तनिवेदिकेला ‘लिसा’ असे नाव दिले आहे.

कंपनीच्या निवेदनानुसार ओटीव्ही नेटवर्कच्या टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर बातम्या सांगण्यासाठी लिसाला प्रोग्रॅम केले आहे. ‘एआय अँकर’ लिसा अनेक भाषेत संवाद साधू शकते; पण सध्या ती फक्त ओडिया आणि इंग्रजी भाषेतच बातम्या वाचणार आहे. आगामी काळात लिसा ओडियामध्ये अधिक प्रभावशाली काम करू शकेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या

इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुणीही लिसाला शोधू शकते व फॉलो करू शकते. एआय न्यूज अँकर हे संगणक निर्मित मॉडेल आहेत जे सामान्य भाषा वापरून आणि प्रत्यक्षात माहिती सांगण्यासाठी तसेच चेहर्‍यावरील हावभाव नियंत्रित करण्यासाठी सखोल अभ्यास करीत आहेत. काही ‘एआय’ न्यूज अँकर रिअल-टाईममध्ये प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासही सक्षम असतात.

Back to top button