धडकणार्‍या आकाशगंगांच्या ‘शॉक वेव्ज’चा छडा | पुढारी

धडकणार्‍या आकाशगंगांच्या ‘शॉक वेव्ज’चा छडा

लंडन : खगोलशास्त्रज्ञांनी दोन आकाशगंगांच्या केंद्रभागी असलेल्या शक्तिशाली कृष्णविवरांच्या कक्षेतून निर्माण झालेल्या शॉक वेव्जचा म्हणजेच धडकेनंतर होणार्‍या कंपनांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या दोन आकाशगंगा एकमेकींमध्ये विलीन होत होत्या. ही कृष्णविवरे काळ आणि अवकाशामध्ये विकृती निर्माण करतात याचाही हा एक पुरावा आहे.

संपूर्ण ब—ह्मांडात अशाप्रकारच्या घटना घडत असतात असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. युरोपियन पल्सर टायमिंग अ‍ॅरे कन्सोर्टियम आणि बोनमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रेडियो अ‍ॅस्ट्रॉनॉमीमधील मायकल क्रेमर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. अंतराळाविषयीच्या आजपर्यंतच्या धारणा बदल्यास हे संशोधन मदत करील असे क्रेमर यांनी म्हटले आहे.

आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाबाबतचा सिद्धांत योग्य आहे का, डार्क मॅटर व डार्क एनर्जीचे अस्तित्व तसेच ब—ह्मांडाच्या अन्यही अनेक रहस्यांवर हे संशोधन नवा प्रकाश टाकू शकते. आकाशगंगांच्या विकासामध्ये शक्तिशाली कृष्णविवरांची कोणती भूमिका असते याबाबतच्या अभ्यासालाही यामुळे चालना मिळेल. मँचेस्टर युनिव्हर्सिटीमधील डॉ. रिबेका बोलर यांनी सांगितले की प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रभागी कृष्णविवर असते हे आता सर्वमान्य झाले आहे; पण एकेकाळी ते केवळ सिद्धांतरूपच होते.

मात्र, ही कृष्णविवरे तिथे का आहेत याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अशी शक्तिशाली कृष्णविवरे कदाचित अशा दोन आकाशगंगांच्या मीलनातूनही विकसित होत असावीत. हे निरीक्षण ‘पल्सर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या मृत तार्‍यांपासून आलेल्या सिग्नल्सच्या अभ्यासातून झाले आहे.

Back to top button