...म्हणून जपानी लोक जगतात अधिक, दिसतात लहान! | पुढारी

...म्हणून जपानी लोक जगतात अधिक, दिसतात लहान!

टोकियो : जपानमधील लोकांनी आत्महत्या केली नाही तर ते शतायुषी होण्याची संधी अधिक असते असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. शिवाय वयाच्या 45 व्या वर्षीही हे लोक पंचवीशीतील वाटत असतात. त्याचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीत दडलेले आहे. या जीवनशैलीमुळेच ते दीर्घायुष्यीही बनतात व त्यांच्या शरीरावर वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसत नाहीत.

जपानचे आयुर्मान सुमारे 84 वर्षांचे आहे, जे भारतीयांपेक्षा सुमारे चौदा वर्षे जास्त आहे. जपानमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांचे वय शंभरपेक्षा अधिक वर्षांचे आहे. जपानी लोकांच्या तरुणपणाचे आणि निरोगी आयुष्याचे रहस्य हे आहे की ते अतिशय संतुलित आहार घेतात. त्यामध्ये सी फूड, सोया उत्पादने, आंबवलेले अन्न, भरपूर भाज्या आणि निरोगी चहा यांचा समावेश होतो. ते अन्न व्यवस्थित चघळून खातात आणि त्याचा आनंद घेतात. अन्न नीट चघळणे चांगल्या पचनासाठी महत्त्वाचे ठरते. जपानी लोक भुकेपेक्षा अधिक खात नाहीत. गरजेपेक्षा अधिक अन्न पोटात जाऊ नये यासाठी ते लहान प्लेटस्, वाट्या आणि चॉपस्टिक्सचा वापर करतात. जपानी लोक कॉफीपेक्षा चहा अधिक पितात. हा चहा औषधी वनस्पतींनी बनवलेला असतो. त्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंटस् असतात जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात व चेहर्‍यावरील वृद्धत्वाच्या खुणा दूर ठेवतात. जपानी लोकांच्या नाश्त्यात उकडलेले तांदूळ आणि लापशी, सूप किंवा मासे असतात. ते तेलाऐवजी अन्न वाफवून, आंबवून, उकळून खातात. वाहनाऐवजी ते चालणे अधिक पसंत करतात.

Back to top button