पत्नीला पोटगी देण्यासाठी सात पोती भरून नेली नाणी! | पुढारी

पत्नीला पोटगी देण्यासाठी सात पोती भरून नेली नाणी!

जयपूर : वाहन किंवा अन्य मोठी वस्तू खरेदी करण्यासाठी नाण्यांच्या स्वरूपात पैसे दिल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अर्थातच अशा घटना लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. आता जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयातून अशीच एक अजब घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी त्रास देण्याच्या एका खटल्यात न्यायालयाने आरोपी पतीला तुरुंगात पाठवणे आणि पत्नीला पोटगी म्हणून 55 हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आरोपीच्या कुटुंबाने रक्कम जमा केली व ती पाहून सगळेच अवाक झाले. ही रक्कम नाण्यांच्या स्वरूपात होती व ती सात पोत्यांमध्ये भरून आणली होती!

या नाण्यांचे वजन सुमारे 280 किलो होते. त्यामध्ये एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी होती. न्यायालयाने नंतर ही नाणी सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला. बारा वर्षांपूर्वी दशरथ कुमावत नावाच्या तरुणाचे सीमाशी लग्न झाले होते. गेल्या पाच वर्षांपासून दोघांचा वाद सुरू होता. सीमाने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. या खटल्याच्या तारखा सुरू होत्या. पतीकडे 2.50 लाख रुपये भरपाई म्हणून मागण्यात आली. अशात ही रक्कम देण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली व न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवण्यासोबतच पोटगीच्या रकमेचा पहिला टप्पा भरण्याचा आदेश दिला. दशरथ कुमावत तुरुंगात असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी 55 हजार रुपयांची नाणी जमा केली. अजूनही त्याला 1.70 लाख रुपये पत्नीला द्यावयाचे आहेत. दुसरीकडे 55 हजार रुपयांची नाणी दिल्यानंतर सीमा कुमावतच्या वकिलांनी सांगितले की हे सगळं तिला त्रास देण्यासाठीच केले जात असून हे अमानवीय आहे. नाणी पाहिल्यावर न्यायालयाने सांगितले की ही नाणी मोजण्यासाठी दहा दिवस लागतील.

Back to top button