स्मार्टवॉचने वाचवले रक्ताच्या गुठळीच्या समस्येपासून | पुढारी

स्मार्टवॉचने वाचवले रक्ताच्या गुठळीच्या समस्येपासून

सॅन फ्रान्सिस्को : हल्ली स्मार्टवॉचचा वापर अनेक लोक करीत असतात. अशा वॉचमुळे आपण किती पावले चाललो यापासून ते आपल्या हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके व आरोग्याशी संबंधित अन्यही अनेक बाबी समजू शकतात. आता अशाच एका स्मार्ट वॉचने एका महिलेस रक्ताच्या गुठळीच्या समस्येपासून वेळीच सावध करून वाचवले.

किम्मी वॉटकिन्स नावाच्या या महिलेची प्रकृती ठीक नव्हती व विश्रांतीसाठी ती झोपली. याच काळात तिने परिधान केलेल्या स्मार्ट वॉचने तिला 178 बीट प्रतिमिनिट अशा उच्च गतीने हृदयाचे ठोके पडत असल्याबाबत तिला इशारा दिला. या घड्याळाच्या अलार्मने तिला झोपेतून आणि अज्ञानातूनही जागे केले. तिच्या हृदयाचे ठोके सामान्य स्थितीपेक्षा बरेच अधिक होते. ते पाहून किम्मी आपल्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली. तिथे तपासणीवेळी आढळले की तिला सॅडल पल्मोनरी एम्बोलिझम आहे. या महिलेला रक्ताच्या गुठळीचा (ब्लड क्लॉट) आजार होता. सध्या ती रक्त पातळ होण्याचे औषध घेत असून आपल्या स्टॅमिनावर काम करीत आहे.

Back to top button