मेंदूत निष्क्रिय अवस्थेत राहू शकतो ‘एचआयव्ही’ | पुढारी

मेंदूत निष्क्रिय अवस्थेत राहू शकतो ‘एचआयव्ही’

न्यूयॉर्क : एका नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की ‘एचआयव्ही’ हा विषाणू मेंदूत निष्क्रिय अवस्थेत राहू शकतो व उपचार बंद केल्यानंतर एड्सचे संक्रमण पुन्हा वाढू शकते. जीवनचक्राचा एक भाग म्हणून ‘ह्युमन इम्युनोडिफिसिएन्सी व्हायरस-1’ (एचआयव्ही) आपल्या डीएनएची एक प्रत मानवी रोगप्रतिकारक पेशीत समाविष्ट करू शकते.

या नव-संक्रमित रोगप्रतिकारक पेशींपैकी काही दीर्घकाळापर्यंत एक निष्क्रिय, अव्यक्त अवस्थेत संक्रमण करू शकतात. सध्याच्या काही उपचार पद्धतींपैकी अँटीरेट्रोव्हायरल थेरेपीसारख्या पद्धतीत विषाणूला पुढे वाढण्यास यशस्वीरीत्या रोखले जाऊ शकते. मात्र, ती अव्यक्त एचआयव्हीला नष्ट करू शकत नाही. जर उपचार बंद केले तर हा विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि व्यक्तीला एड्स होऊ शकतो.

अशा गुप्त पेशी शरीरात कुठे कुठे लपलेल्या असू शकतात याचा संशोधक शोध घेत होते. या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ क्लिनिकल इन्वेस्टिगेशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की मेंदूतील मायक्रोग्लियल पेशींमध्ये असा विषाणू निष्क्रिय अवस्थेत लपून राहू शकतो. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील एचआयव्ही क्युअर सेंटरमधील युयांकरग तांग यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

Back to top button