अंटार्क्टिकाजवळील महासागरांसाठी पोषक प्रवाह झाले मंद | पुढारी

अंटार्क्टिकाजवळील महासागरांसाठी पोषक प्रवाह झाले मंद

सिडनी : अंटार्क्टिकाजवळील 40 टक्के खोल महासागरांमध्ये जाणारे काही प्रवाह पोषक घटक आणि ऑक्सिजनने युक्त असतात. त्याचा सागरी जलचरांना लाभ मिळत असतो. मात्र, 1990 च्या दशकापासून हे प्रवाह 30 टक्क्यांनी मंदावले असून लवकरच ते पूर्णपणे थांबू शकतात असा इशारा संशोधकांनी दिला आहे. महासागराच्या पाण्याचा वरचा स्तर, मधला खोल पाण्याचा स्तर व तिसरा तळातील पाण्याचा स्तर असे तीन स्तर असतात. त्यापैकी खोल पाण्याच्या मधल्या स्तरामध्ये हे प्रवाह जात असतात.

या प्रवाहांना ‘अंटार्क्टिक बॉटम वॉटर्स’ असे म्हटले जाते. अंटार्क्टिका खंडातील थंड पाण्यापासून हे प्रवाह निघतात व ते दहा हजार फूट खोलीपर्यंत जातात. त्यानंतर हे दाट व थंड पाणी प्रशांत व पूर्व हिंदी महासागरापर्यंत फैलावते. त्यामुळे अनेक सागरी प्रवाहांचे जाळे निर्माण होते व जगातील 40 टक्के खोल स्तरातील महासागरांना ताजे पोषक घटक आणि ऑक्सिजन पुरवतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे आता अंटार्क्टिकामधील बर्फाच्या स्तरातून येणारे हे पाणी तितके घनीभूत, दाट राहिलेले नाही. त्यामुळे पाण्याखालील या थंड पाण्याच्या प्रवाहांचे जाळे विस्कळीत होत आहे. सिडनीतील न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीमधील मॅथ्यू इंग्लंड यांनी सांगितले की जर महासागरांना फुफ्फुसे असती तर त्यापैकी एक हे प्रवाह असते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. 2050 पर्यंत असे प्रवाह 40 टक्क्यांपर्यंत मंदावतील असे त्यामध्ये म्हटले आहे. तसेच भविष्यात हे प्रवाह पूर्णपणे थांबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Back to top button