‘मंगळावरच्या घरा’त वर्षभर मुक्काम! | पुढारी

‘मंगळावरच्या घरा’त वर्षभर मुक्काम!

वॉशिंग्टन : भविष्यात मंगळावरची मानव मोहीम झाली तर काय घडू शकते, मानवी शरीर व मनावर या दीर्घकालीन प्रवासाचे तसेच मंगळावरील वास्तव्याचे कोणते परिणाम होऊ शकतात याबाबतची चाचणी अधूनमधून घेतली जात असते. यापूर्वीही काही लोकांना मंगळासारखी स्थिती असलेल्या ठिकाणी दीर्घकाळ ठेवण्यात आले होते. आता तशीच स्थिती असलेल्या एका घराची निर्मिती करण्यात आली आहे. या घरात राहण्यासाठी चारजणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कॅनेडियन जैववैज्ञानिक केली हेस्टन यांचाही समावेश आहे. त्या वर्षभर या घरात राहतील. सर्व काही सुरळीत झाले तर पुढील सात वर्षांमध्ये म्हणजेच 2030 पर्यंत माणसाला मंगळावर पाठवले जाईल. त्याद़ृष्टीने असे प्रयोग सुरू असतात. आता ह्युस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये एक घर बनवण्यात आले आहे.

त्यामध्ये चार लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. हे घर जणू काही मंगळावरील घर आहे अशी तिथे स्थिती निर्माण केलेली आहे. लवकरच केली या घरात राहण्यासाठी जातील. या घरामध्ये केली ट्रेनिंग घेतील आणि वर्षभर राहतील. या काळात त्या बाहेर येऊ शकणार नाहीत की इतर कुणी आतही जाऊ शकणार नाही. केली यांनी सांगितले, मी लहानपणीही कधी मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. कधी कधी मी याबाबत विचार करते त्यावेळी माझे मलाच हसू येते! मात्र या प्रोजेक्टसाठी मी उत्साहित आहे आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे. जूनच्या अखेरीस चारही संशोधक या घरामध्ये जातील आणि सुमारे बारा महिने राहतील. आतील वातावरण अगदी मंगळासारखेच आहे. तेथे मंगळासारखीच लाल मातीही ठेवलेली आहे.

त्यांनी जर कंट्रोल सेंटरमधून संपर्क केला तर त्यांचा मेसेज मिळण्यासाठी वीस मिनिटेच लागतील. त्यानंतर कंट्रोल सेंटरचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वीस मिनिटे लागतील. वास्तवातही मंगळावर सिग्नल पाठवण्यासाठी इतकाच वेळ लागतो. हे घर थ—ीडी प्रिंटेड आहे आणि 160 चौरस मीटर जागेत फैलावलेले आहे. त्याला ‘मार्स ड्यून अल्फा’ असे नाव देण्यात आले आहे. या घरात चार बेडरूम, जीम, किचन, रिसर्च सेंटर आहे. या घराला एअरलॉकद्वारे वेगळे केले आहे. याठिकाणी चारही संशोधक मार्स वॉकचाही सराव करतील. याठिकाणी खाणे-पिणे किंवा आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठीचा सरावही ते करतील. या काळात ते केवळ मेलद्वारे कुटुंबीयांच्या संपर्कात राहतील. कधी कधी ते व्हिडीओ मेसेजही पाठवू शकतील. मात्र, त्यांचे बोलणे ‘लाईव्ह’ असणार नाही. त्यामध्ये वीस मिनिटांचे अंतर असेल.

Back to top button