सूर्यापेक्षा दहा हजार पट मोठ्या महाकाय तार्‍यांचा शोध | पुढारी

सूर्यापेक्षा दहा हजार पट मोठ्या महाकाय तार्‍यांचा शोध

जिनिव्हा : जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने आता सूर्यापेक्षा दहा हजार पट अधिक वस्तुमान असलेल्या तार्‍यांच्या समूहाचा शोध घेतला आहे. या तारकापुंजात लाखो तारे असून त्यापैकी काही ब्रह्मांडातील सर्वात जुन्या तार्‍यांपैकी आहेत. ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या पहाटेच्या काळातील हे तारे असावेत असे संशोधकांना वाटते.

एका महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती सुरू झाली असे मानले जाते. या महाविस्फोटाला ‘बिग बँग’ असे नाव आहे. या ‘बिग बँग’नंतर अवघ्या 440 दशलक्ष वर्षांनंतर निर्माण झालेले तारे या तारकापुंजात आहेत. जड मूलद्रव्यांची बीजे आपल्या ब्रह्मांडात कशी पेरली गेली याची माहिती या तार्‍यांच्या अभ्यासातून समजू शकेल. संशोधकांनी या महाकाय तार्‍यांना ‘सेलेस्टियल मॉन्स्टर्स’ असे नाव दिले आहे.

या अवकाशीय दैत्यांची माहिती ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे प्राध्यापक कोरिनी चार्बोनेल यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून गोळा केलेल्या डाटाच्या आधारे हे संशोधन करता आले. त्यामुळेच या असामान्य तार्‍यांची माहिती समजू शकली.

Back to top button