ओमानमध्ये सापडले 7 हजार वर्षांपूर्वीचे थडगे | पुढारी

ओमानमध्ये सापडले 7 हजार वर्षांपूर्वीचे थडगे

लंडन : पुरातत्त्व संशोधकांनी ओमानमध्ये तब्बल 7 हजार वर्षांपूर्वीचे दगडी थडगे शोधून काढले आहे. त्यामध्ये डझनभर लोकांच्या देहाचे अवशेष आढळून आले. या एकाच थडग्यात सर्व लोकांना दफन करण्यात आले होते.

ओमानमधील मध्य अल वुस्ता प्रांतातील नाफूनजवळ हे थडगे सापडले. हे ओमानमध्ये सापडलेले आतापर्यंतच्या सर्वात जुन्या मानवनिर्मित रचनेपैकी एक आहे. ही दफनभूमी समुद्रकिनार्‍याच्या समोर आहे; पण तिथे केवळ खडकाळ जमीनच आहे. झेक प्रजासत्ताकच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजी या प्रागमधील संस्थेतील अल्झबेटा डॅनिएलिसोवा यांनी सांगितले की या परिसरात ब्राँझ युगातील किंवा त्यापेक्षा पुरातन कोणतेही थडगे यापूर्वी आढळले नव्हते.

त्यामुळे हे थडगे अतिशय असामान्यच म्हणावे लागते. दहा वर्षांपूर्वी सॅटेलाईट फोटोग्राफ्समध्ये या थडग्याचा सुगावा लागला होता. हे थडगे इसवी सनपूर्व 5 हजार ते इसवी सनपूर्व 4600 या दरम्यानचे असावे असे संशोधकांना वाटते. या थडग्याच्या भिंती कमी जाडीच्या दगडांनी बनवलेल्या आहेत. थडग्यात दोन गोलाकार दफनकक्ष आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button