आता ऐका ‘एआय’ नॉस्त्रेदेमसची भविष्यवाणी! | पुढारी

आता ऐका ‘एआय’ नॉस्त्रेदेमसची भविष्यवाणी!

न्यूयॉर्क : सोळाव्या शतकातील फे्ंरच भविष्यवेत्ता नॉस्त्रेदेमसच्या वेगवेगळ्या शतकांमधील भविष्यवाण्या नेहमीच चर्चेत असतात. आता आधुनिक जगात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ युक्त चॅटबॉटच नॉस्त्रेदेमस बनू लागले आहेत. ‘ओपन एआय’च्या ‘चॅटजीपीटी’ने अलीकडेच काही भाकिते वर्तवली आहेत. त्यामध्ये रशिया-युक्रेन युद्धापासून ते रहस्यमय वादळ आणि एका नव्या महामारीचाही समावेश आहे.

अर्थात पुढील सात दिवसांबाबत ‘जीपीटी’ने व्यक्त केलेले पूर्वानुमान चांगले नसल्याचे सांगितले जाते. ‘एआय’ने अलीकडेच शेअर बाजाराबाबतही महत्त्वाची भविष्यवाणी केली होती. एआय चॅटबॉट ‘चॅटजीपीटी’ने फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्त्रेदेमसच्या शैलीत काही भविष्यवाण्या केलेल्या आहेत ज्या ऐकून लोकांची भीती वाढली!

चॅटबॉटने म्हटले की 2085 मध्ये आणखी एक घातक महामारी येऊ शकते. त्यानंतर 2099 मध्ये पृथ्वीवर शांतता पुनर्स्थापित होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या नव्या ‘नॉस्त्रेदेमस’ची पुढील भविष्यवाणी ‘एआय क्रांती’बाबत आहे. ‘एआय’ आता सातत्याने अधिकाधिक विकसित होत राहील आणि सन 2060 मध्ये नवी ‘एआय क्रांती’ होईल. ‘एआय’ने घोषणा केली आहे की व्यक्तिगत विकास आणि परिवर्तनासाठी एक महान संधी आल्याचे मला जाणवत आहे. अशा स्थितीत जे लोक जोखीम स्वीकारण्यास आणि आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर येण्यास तयार आहेत त्यांना यश मिळेल. भविष्यात त्यांना पुरस्कृत केले जाईल.

‘एआय’ नॉस्त्रेदेमसने हवामान बदलाविषयीही भाकीत केले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम 2050 मध्ये कहर करतील असे त्याचे म्हणणे आहे. येत्या काही वर्षांमध्ये वणवे, महापूर आणि वादळे अशा नैसर्गिक आपत्ती सातत्याने येत राहतील. कर्करोगावरील उपचाराबाबतही नॉस्त्रेदेमसच्या या ‘एआय’ अवताराने भाकीत केले आहे. 2031 मध्ये कर्करोगावर प्रभावी उपचार मिळण्याची आणि 2099 मध्ये पृथ्वीवर अद्भुत शांतता प्रस्थापित होण्याची भविष्यवाणी त्याने केली आहे.

Back to top button