अ‍ॅन फ्रँकच्या डायरीबद्दल साशंकता घरावर आक्षेपार्ह लिखाण | पुढारी

अ‍ॅन फ्रँकच्या डायरीबद्दल साशंकता घरावर आक्षेपार्ह लिखाण

अ‍ॅम्स्टरडॅम : दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी सैन्याने ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार केले. या भयावह अनुभवातून गेलेल्या आणि हिटलरच्या छळछावणीतच वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडलेल्या अ‍ॅन फ्रँक या शाळकरी मुलीने आपल्या अज्ञातवासाच्या दोन वर्षांच्या काळात डायरी लिहिली होती. तिच्या मृत्यूनंतर ही डायरी प्रकाशित झाली आणि जगप्रसिद्धही बनली. आता नेदरलँडची राजधानी अ‍ॅम्स्टरडॅममधील तिच्या घराच्या भिंतीवर कुणी तरी आक्षेपार्ह लिखाण केले आहे व तिची डायरी खोटी असल्याचे म्हटले आहे. अर्थात हे आरोप काही नवे नाहीत!

तिच्या घरावर लिहिले की ‘अ‍ॅन फ्रँक, बॉल पॉईंट पेन शोधणारी!’ युरोपमध्ये एक गट असाही आहे जो अ‍ॅन फ्रँकची डायरी फेक असल्याचे मानतो. त्यामागे हे कारण दिले जाते की अ‍ॅनच्या डायरीचा मोठा हिस्सा बॉल पॉईंट पेनने लिहिलेला आहे, वास्तविक त्या काळात अशा पेनचा शोधच लागला नव्हता. त्यामुळे कुणीतरी नंतरच्या काळात ही डायरी लिहिल्याचे काहींचे म्हणणे आहे. अर्थात डच सरकारने हा आरोप खोटा असल्याचे यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यासाठी सरकारने अनेक वर्षे काम केले होते. त्यानंतर 1989 मध्ये सरकारने ही डायरी अधिकृत व खरी असल्याचे जाहीर केले. 719 पानांचा एक वैज्ञानिक अहवालही यासाठी देण्यात आला होता. यामध्ये अ‍ॅनच्या हस्ताक्षराचीही तज्ज्ञांनी तपासणी केली होती.

युरोपमध्ये काही लोक असे आहेत ज्यांचे म्हणणे आहे की दुसर्‍या महायुद्धाच्या काळात नाझींनी यहुदींना म्हणजेच ज्यू लोकांना कोणत्याही यातना दिल्या नाहीत. ज्यू लोकांनी केवळ सहानुभुती मिळवण्यासाठी छळाच्या खोट्या कहाण्या रचल्या. असेच लोक अ‍ॅनच्या डायरीलाही खोटे समजतात. अर्थातच त्यांचे म्हणणे किती तकलादू आहे हे जगाला ठावूक आहे. गुप्त निवासावेळी अ‍ॅन डच भाषेत डायरी लिहित असे व त्या भयावह काळातील त्यांचे जीवन या डायरीमधून जगाला समजले.

छळछावणीत अ‍ॅन व तिची मोठी बहीण मार्गो यांचा टॉयफॉईडने मृत्यू झाला तर आई भुकेने मृत्युमुखी पडली. युद्ध संपेपर्यंत या कुटुंबातील तिचे वडील ऑटो फ्रँकच बचावले व ते अ‍ॅम्स्टरडॅमला परतले. त्यांनीच 25 जून 1947 मध्ये तिची डायरी प्रकाशित केली. ही डायरी 1952 मध्ये ‘द डायरी ऑफ यंग गर्ल’ या नावाने इंग्रजीत प्रकाशित झाली व ती इतकी लोकप्रिय ठरली की आतापर्यंत तिचे जगभरातील 70 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. या पुस्तकाच्या तीन कोटींपेक्षाही अधिक प्रती खपल्या असून डायरीवर आधारित अनेक चित्रपट व नाटक लिहिण्यात आले आहेत.

Back to top button